You are currently viewing मी छंदी मी स्वछंदी

मी छंदी मी स्वछंदी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे यांच्या “मी छंदी मी स्वछंदी” गझल संग्रहाचे लेखक कवी राजू गरमडे यांनी केलेला पुस्तक परिचय*

 

⭐ मानवी आयुष्यावर ‘ चिकित्सक ‘ पणे भाष्य करणारा आणि विचारांनी समृद्ध करणारा नितांतसुंदर असा गझलसंग्रह ⭐

 

कविता ही जीवनाची पथदर्शक आहे अस म्हटल्यास वावगं ठरू नये.

कवितेमध्येच मानवी जीवनाच..समाजाच..प्रतिबिंब पडलेल असत.म्हणूनच कवीला ‘ समाजाचा प्रतिनिधी ‘ म्हटल जातयं.

शब्दांमध्येच प्रेरणा असते..कौतुक असते..तसच शब्दांमध्येच वास्तवही दडलेल असत.नकारात्मताही असते तशीच सकारात्मताही.

म्हणूनच…

जे शब्द मनाला ऊभारी देतात..ऊर्जा देतात..जगणं अधिकच सुंदर करतात..जीवनाच सौंदर्य दाखवितात..आणि विशेष म्हणजे आपण का जगायला हवयं यांची जाणिव करून देतात तेच शब्द आपल्यासाठी ” दीपस्तंभ ” ठरत असतात.

नुकताच प्रकाशित झालेला *..मी छंदी – मी स्वछंदी ..* हा कवी – गझलकार श्री.जयराम धोंगडे सरांचा गझलसंग्रह वाचण्यात आला.

‘ आनंदकंद ‘ या गझल वृत्तात लिहिलेल्या एकुन ८६ गझला या संग्रहामध्ये समाविष्ट आहे.

 

‘ शब्दाटकी ‘ ‘ कोरोनायण ‘ ‘ जय बोले ‘ ‘ तिपेडी ‘ या कविता – गझलसंग्रहानंतर आलेला हा सरांचा ५ वा गझलसंग्रह आहे.

 

या गझलसंग्रहातून कवीनी विविध विषय हाताळले आहेत.यातूनच त्यांची प्रगल्भ दृष्टी तर अधोरेखित होतेच शिवाय मानवी जीवन अधिकच सुंदर करण्यासाठी आणि समाजामध्ये एकोपा..शांती..समृद्धी..नांदावी त्यासाठी करीत असलेल्या धडपडीच..आणि..त्यांच्या गझलेच मनापासून कौतुक करावसं वाटतं.

 

एक प्रकारे त्यांची गझल जीवनाच समग्र दर्शन घडविणारी आहे.श्रीकृष्णानी अर्जूनाला जस विराटदर्शन घडविल अगदी त्याचप्रकारे जीवनाच..समाजाच..मुल्यांच..विचारांच..भावनांच..आपुलकीच..मायेच..त्यागाच..दर्शन त्यांच्या गझलेतून वाचकांना अनुभवयाला मिळत आहे.

 

जीवनाच सार सांगणारी आणि जगण्याचे विविधांगी पैलू ऊलगडणारी त्यांची *..चिंतन..* ही गझल सर्वाथाने जीवनाच शाश्वत सत्य मांडणारी आहे.

जन्म आपल्या हातात नसतो.पण मिळालेला देह ऊपभोगात घालवायचा की,समाजासाठी खर्ची घालायचा हे माञ आपल्या हातात असतं.यावरुन तुमच्या जीवनाच मुल्य ठरतं असत.

 

जगलास तू कितीसा नाहीच मोल त्याला,

केलेस काय जगुनी,हे विषय चिंतनाचे !

 

जीवनाचं सत्य मांडतानाच कवी नशीबावरही लिहित आहे.दैववादी प्रवृत्ती ही नशीबावरच अवलंबून असते तर क‌ष्ट आणि प्रयन्न करणार्‍यांचा मनगटावर विश्वास असतो.*..जिंकून घे जगाला..* या गझलेतून नशीबाला दोष न देता कष्टानेच जीवनाला घडविता येते हा कानमंञही कवीने दिलेला आहे.

 

नशीबास दोष देणे झाली प्रथा अताशा,

गाळून घाम वेड्या तू भाग्य खोड थोडे !

 

दैव..आळसी..प्रवृत्ती ही माणसाला यशापासून भरकटवत नेत असते हे ही तितकच सत्य आहे.

आपल्याला हे सुंदर जग ज्यांच्यामुळे बघायला मिळालं त्या मायबापाविषयी आपल्या मनात नेहमीच कृतज्ञता असली पाहिजे.त्यांनी घेतलेल्या कष्टाच आपण सार्थक केले पाहिजे.म्हणूनच,जोवरी श्वास आहे तोवरी त्यांची काळजी आपण घ्यायलाच हवी.

कवीच्या *..पुढेही..* या गझलेतून हाच आशय व्यक्त होत आहे.

 

ध्यासात बाप माझा श्वासात रोज आई,

जीवात जीव जोवर आठव असे पुढेही !

 

मायबापाचे ऋण हे आपण कितीही जन्म घेतले तरी फेडूच शकत नाही हे ञिकालबाधित सत्य आहे.

आपला जगाचा पोशिंदा म्हणजेच बळी राजा.काळ्या मातीत हिरव सोन पिकविणारा.त्यासाठी तो अहोराञपणे राबत असतो.पण कधी पिक जोमात दारी आल की,मालाला कवडीमोल भाव मिळतो.

कवीच्या *..माहोल..* या गझलेतून हाच आशय व्यक्त झालेला आहे.

 

दिनरात राबल्यावर हातात पीक आले,

मालास भाव कोठे,पोटात घास नाही !

 

बळी राजाच्या विपरित परिस्थीतीवर भाष्य करतानाच गर्भामध्येच मुलींना मारणार्‍या माणसाच्या प्रवृत्तीवरही तितकच गर्भित भाष्य कवी करीत आहे.मुलगा – मुलगी हा भेद पाळणारी प्रवृत्ती आजही आपल्या सभोवताली वावरत आहे.

गर्भामध्येच लेकीनां मारणारे हे खुनीच आहे.

*..ऋणीच आहे ! ..* या गझलेतून कवी हीच भावना व्यक्त करीत आहे.

 

समतोल राख ना तू का भेद लेकराचा ?

गर्भास पाडणारा,येथे खुनीच आहे !

 

लेकींना गर्भातच मारणार्‍या प्रवृत्तीवर लिहितानाच मानवी जीवनावरही कवी लिहित आहे.चौर्‍यांशी लक्ष योनीच्या फेर्‍यानंतर हा मानवी जन्म आपल्याला मिळालेला आहे.म्हणूनच,जीवनाचा भरभरुन आनंद आपण घेतलाच पाहिजे आणि इतरांनाही दिला पाहिजे.मन प्रसन्न असेल तर अवघ जगच आपल्याला सुंदर भासत असत.त्यामुळे कोणतेच विकार आपल्याला स्पर्शच करु शकत नाही.

*..उपाधी..* ही गझलही जीवनावर मार्मिक भाष्य करीत आनंदाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.

 

आहेस चांगला तू तोवर जगून घे ना,

आनंद दे जगाला,ना लागणार व्याधी !

 

जगणं अधिकच सुंदर करायला लावणारी ही गझल आहे.

जीवनावर लिहितानाच कवी नात्यावरही लिहित आहे.नात्यामध्ये विश्वासाला..शब्दाला..महत्व आहे.तरच नातं फुलतं आणि बहरतही.

*..शब्द..* याच गझलेतूनही हाच भाव व्यक्त झालेला आहे.

 

देतोच शब्द आहे तर त्यास पाळ मिञा…

नात्यात मोल आहे शब्दास पाळण्याला !

 

नात्यामध्ये आपुलकीचा आणि स्नेहाचा दरवळ असला की,नात्याचे ऋणानुबंधही घट्ट होत जातात हे लिहिताना कवी प्रेमावरही लिहित आहे.हे विश्वच प्रेमाच्या पायावर ऊभं आहे.माणसांमाणसामध्ये घनिष्ठता वाढवायची असेल तर प्रेमच आहे जे एकमेकांना ..धाग्यात बांधून ठेवत असते.

*..जगण्याचा मंञ..* या गझलेतूनही प्रेमाची अभिव्यक्ती मांडलेली आहे.

 

ही बाग माणसाची यावी फुलून सारी,

पर्याय कोणता ना,प्रेमाशिवाय मिञा !

 

प्रेमभावनेवर लिहितानाचं कवी मायेचं मुर्तीमंत रूप म्हणजे आईवरही लिहितं आहे.आपलं आयुष्य घडतं ते आईने घेतलेल्या कष्टामुळे आणि त्यागामुळेच.त्यामुळेच आपण यशाला गवसणी घालू शकतो.पण या यशाच कौतुक करण्यासाठी जेव्हा आई या जगात नसते तेव्हा माञ आपल्या त्या यशाचा आनंद द्धिगुणीत होत नाही.

*..आई..* या गझलेतूनही आईवरही सुंदर लिहिलेल आहे.

 

मी घालतो गवसणी आकाश काय त्याचे ?

पण पाठ थोपटाया आईच आज नाही

 

आईवर लिहितानाच कवी जन्म आणि मृत्युवरही लिहित आहे.जन्म आणि मृत्यु यापासून कोणाचीही सुटका नाही.जन्मताना पासून रडत असतो.या गझलेतून कवी म्हणतो की,जे जग इतक सुंदर आहे की,या जगाच्या मी प्रेमातच पडलेलो आहे.म्हणूनच,मी अस आयुष्य जगेन की,हे जग सोडून जातानासुद्धा मी रडणार नाही.

कवीच्या *..मी..* या गझलेतूनही हाच आशय व्यक्त होत आहे.

 

आलो रडत जरीही जाणार ना रडत मी

आयुष्य फार सुंदर वादात ना पडत मी

 

जन्म आणि मृत्यु वर मार्मिक भाष्य करतानाच कवी माणसांच्या श्रद्धेवरही लिहित आहे.मनात भक्तीभाव..श्रद्धा..विश्वास..असेल तर चराचरातील प्रत्येक वस्तुमध्येच आपल्या भगवंत दिसत असतो

*..साधे सरळ नि सोपे..* या गझलेतूनही श्रद्धेचे भाव व्यक्त झालेले आहे.

 

दगडात देव नाही म्हणतात सर्व हल्ली,

श्रद्धा मनात ठेवा मग दगड पावतो की !

 

मनातल्या श्रद्धेवर लिहितानाच कवी मानवधर्मावरही लिहित आहे.द्धेष..भांडणे..अविश्वास..कटूता..या सार्‍या गोष्टी बाजूला सारल्या की,एकमेकांमध्ये संवादाचा..प्रेमाचा..आणि..एकतेचा सेतू निर्माण होत असतो.

*..माणूस धर्म..* या गझलेतूनही माणसाचा नेमका धर्म कोणता हे सांगितले आहे.

 

लावून जीव थोडा माणूस धर्म पाळा,

भांडण कलागतीला,सारे मिळून टाळा !

 

या गझलसंग्रहातील सर्वच गझला वाचकांच्या मनाला भिडणार्‍या आहेत.विचारांचा तळ गाठणार्‍या काही गझलेतील शेर रसिक वाचकांसाठी देत आहे.

 

आचार चांगला अन् ठेवा विचार मोठा,

मन चांगले रहाया,शरीरात ञाण मिञा !

 

शहरात माणसांची गर्दी अलोट झाली,

ओसाड ग्राम झाले शेतास कोण वाली ?

 

मिञामुळेच आहे जगण्यात शान मिञा,

कामात जोश अन् तो अंगात ञाण मिञा !

 

सांगून ज्ञान गेले शाहू फुले नि बाबा,

वागून त्याप्रमाणे आचारही खुलावा ,

 

कंपायमान झाले अवघेच सूर आता,

जाता लता सुरीली गेलाय नूर आता !

 

शब्दश्री प्रकाशन संस्थेने अगदीच देखण्या स्वरुपात हा संग्रह वाचकांच्या हाती सोपविलेला आहे.

 

या गझलसंग्रहाला तितकीच दमदार..वाचनीय..चिकित्सक..आणि..गझलेचे सौंदर्य ऊलगडणारी सुंदर अशी प्रस्तावना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ..जेष्ठ साहित्यिक आ.डाॅ.श्रीपालजी सबनीस सरांची लाभलेली आहे.

तर पाठराखण जेष्ठ गझलकारा सौ.चंदना सोमाणी यांनी केलेली आहे.

 

पुन्हा एकदा मी कवी..गझलकार श्री.जयराम धोंगडे सराचे मनपुर्वक अभिनंदन करतो.त्यांच्या पुढील साहित्यवाटचालीला आणि पुढील आयुष्याला शुभेछा देतो.पुढेही त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित होत राहो,त्यांच्या साहित्यकृतीना मानसन्मान लाभत राहो अशी मंगल कामना करतो.

 

– राजू गरमडे..ऊर्जानगर.जि.चंद्रपूर.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गझलसंग्रह :- मी छंदी मी स्वछंदी

गझलकार :- श्री.जयराम धोंगडे

प्रकाशन :- शब्दश्री प्रकाशन,पुणे.

प्रथमावृत्ती :- २५ नोव्हेंबर २०२३

प्रस्तावना :- डाॅ.श्रीपाल सबनीस

पाठराखण :- गझलकारा चंदना सोमाणी

मुखपृष्ठ :- जयवंत गायकवाड

पृष्ठे :- ९६

मूल्य :- ₹ २००/-

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + nine =