कुडाळ :
संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या कोविड रूग्णांसाठी मोफत सेवा सुरू असलेल्या कोविड सेंटरचा आदर्श सर्वानी घ्यावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील यांनी केले. या कोविड सेंटरच्या स्तुत्य समाजोपयोगी उपक्रमासाठी श्री. रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीने मदतीचा हात दिला.
सध्या सारे जग कोविड १९ सारख्या महाभयंकर अशा संकटाला सामोरे जात आहे. कोरोनामुळे अनेक यंत्रणा ही कोलमडून पडल्या आहेत. अशातच समाजातील काही दानशुर व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने सेवा देत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ सिंधुदुर्ग या संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर होय. आपण समाजाचे एक घटक आहोत. या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. हीच सामाजिक बांधिलकी ओळखून चेअरमन उमेश गाळवणकर यांनी कोविड सेंटर उभे केले व कोरोना रुग्णांना निःशुल्क सेवा देण्यास सुरुवात केली.
त्यांच्या या सेवेला आपणही थोडासा हातभार लावावा. या उदात्त हेतूने समाजातील काही संस्था पुढे येत आहेत. त्यातीलच एक संस्था म्हणजे श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी कुडाळ शाखा होय. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमात आपणही खारीचा वाटा उचलावा. या हेतूने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम .एल. चौगुले यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ सिंधुदुर्ग या संस्थेने उभारलेल्या कोविड सेंटरसाठी संस्थेचे चेअरमन गाळवणकर यांना रु. १० हजाराची आर्थिक मदत केली. सोमवारी दि. 24 रोजी सायंकाळी डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी ही मदत केली.
यावेळी श्री रवळनाथ प्रधान कार्यालयाचे संचालक महेश मजती, कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर गुरबे, बॅरिस्टर नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपीचे डॉ शुक्ला, प्राचार्य डॉ. भंडारी, पल्लवी कामत, प्रा. अरुण मर्गज, सिद्धेश गाळवणकर, श्री रवळनाथ शाखाधिकारी विक्रम जांभेकर, प्रा. बाबर्डेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ पाटील म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै संस्थेने पै यांच्या नावाला साजेशे असे काम केले आहे. अशा प्रकारची दुर्मिळ सेवाभावी अपवादात्मकच आढळते. आज अनेक ठिकाणी कोरोना सेंटर उभे झाले. पण सेवाभावी वृत्तीने मनोभावे मोफत सेवा देणारी संस्था बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था होय. या सुंदर शैक्षणिक संकुलात साकारणाऱ्या शासन मान्यता कोविड सेंटरमधील असणारी स्वच्छता तसेच येथील सर्वांच्या सेवाभावी कार्याने आम्ही भारावून गेलो, असे सांगितले यावेळी बोलताना श्री चौगुले म्हणाले. रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी ही घरासाठी कर्ज देणारी संस्था आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै संस्थेने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतानाच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आणि करीत आहे. कोरोना सकटात त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने मदत करण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वानी घ्यावा असे आवाहन ही श्री. चौगुले यांनी केले.
यावेळी “१७ दिवसात रवळनाथ संस्थेने घरांचे प्रस्ताव मंजूर केले. रवळनाथ संस्थेचे कार्य फार मोठे आहे. घरांसाठी कर्ज देणाऱ्या या संस्थेचे कार्य फक्त कर्ज देण्यापूरतेच नसून तर या संस्थेने अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात गरजूंना सर्वतोपरी आर्थिक मदत केली. नुकत्याच तौक्ते चक्रीवादळात या संस्थेने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत केली. आमच्या संस्थेतील १० ते १२ शिक्षकांसाठी अवघ्या १७ दिवसात घरांसाठी कर्ज देण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. नावलौकिक प्राप्त या रवळनाथचे आम्ही ऋणी आहोत”, असे गाळवणकर यांनी सांगितले.