You are currently viewing सर्वसामान्य जनतेला दांडा आणि दंड.

सर्वसामान्य जनतेला दांडा आणि दंड.

राजकीय लोकांच्या गर्दीला लगाम कोण घालणार?

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या संकटात झुजत आहे, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, लोकांना आरोग्य सुविधा मिळविणे कठीण जात आहे, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.अशा परिस्थितीत जिल्ह्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात कधी नव्हे एवढी हानी केली. शेकडो घरांची छप्पर उडाल्याने बिकट अवस्था झाली, तर काही घरे जमीनदोस्त झाली. हजारो उपयोगी माड, फणस, आंबा, काजू, फोफळींच्या बागाच्या बागा वादळात उध्वस्त झाल्या. कोकणात अतोनात हानी झाली. परंतु वरिष्ठ पातळीवरून अजून कोणतीही मदत सरकारने जाहीर केली नाही. जिल्ह्यात प्रत्येक पक्षांच्या नेत्यांचे दौरे मात्र जोरदार सुरू आहेत. नुकसानभरपाई देण्याचे कोणीही जाहीर करत नाही. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्यालाच सर्वात जास्त कोकणचा कळवळा हे दाखविण्यासाठी लोकांमध्ये मिसळतात, लोकांची गर्दी खेचून घेतात.
जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावता दौरा करून जास्त गर्दी न होता कमीतकमी वेळात पाहणी करून दौरा आटोपता घेतला. परंतु कालपासून जिल्ह्यात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते मात्र जिल्ह्यात लोकांच्या गर्दीच्या गोतावळ्यात नुकसानीची पाहणी करत फिरत आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील नेते, लोकप्रतिनिधी तर आहेतच शिवाय जिल्ह्यातील काही बुजुर्ग मंडळी ज्यांना नाकावर मास्क लावण्यासाठी देखील त्रास होत असावा अशी काही मंडळी नुकसानीची माहिती देत फिरत आहेत. गर्दीत देखील धड तोंडावर मास्क न लावता ही मंडळी नेत्यांसोबत चमकोगिरी करत फिरल्याने कोरोनाच्या विळख्यात सापडतात आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परंतु प्रत्येक नेता जिल्ह्याचा कळवळा आपल्यालाच आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी काहीही न करता केवळ एकमेकांवर आरोप करून जनतेसमोर आणि जिल्हावासीयांसमोर स्वतःचा हशा करून घेताना दिसत आहेत.
जिल्ह्यात जनता वादळाबरोबरच कोरोनाने त्रस्त आहे, कोरोनाचे सावट जिल्ह्यावर असताना पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी वगळता नेत्यांच्या दौऱ्यात जनतेला कोणताही रस नाही आहे. घराघरात कोरोना रुग्ण सापडत असल्याने लोकांना स्वतःच्या जीवाची काळजी लागून राहिली आहे, परंतु कोरोनाच्या संकटात राजकारण करत जिल्ह्यात दौरे काढणाऱ्या नेत्यांना मात्र लोकांच्या जीवाचे कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे दौऱ्यात गर्दी झाल्याने लोकांचे जीव जातात याचे नेत्यांना भानही राहत नाही.
सर्वसामान्य माणूस बाजारपेठेत गेला तर पोलीस अधिकारी लोकांना वेठीस धरतात, दंड किंवा दांडा अशी शिक्षा देतात परंतु हेच आयपीएस अधिकारी नेत्यांच्या सोबत असताना राजकीय लोकांची गर्दी होते तेव्हा मात्र चिडीचूप राहतात. म्हणजे राजकीय गर्दीत कोरोना चिरडून मरतो आणि सर्वसामान्य माणूस कामासाठी गेला तरी त्याला कोरोना डसतो का? असा प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कित्येक लोकप्रतिनिधींनी जीव गमावला आहे, अनेकांना कोरोनाने पछाडले आहे असे असतानाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची देखील महिला वर्गाला घाई झाल्याचे दिसून येते. जिथे डॉक्टर सुद्धा हॅन्डग्लोज घालून वावरतात, तिथे जिल्ह्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी आणि राज्याचे नेते राजकारण करण्यासाठी दौरे आयोजित करतात आणि दौऱ्यात होणाऱ्या गर्दीवर भाष्य देखील करत नाहीत किंवा आपल्या भोवती होणारी गर्दी रोखण्याचाही प्रयत्न करत नाहीत. आपल्या भोवती झालेल्या गर्दीने भारावून नेते खुशीत दौरे करत असताना सर्वसामान्य लोकांची मात्र त्यांना फिकीर नसते. त्यामुळे एकीकडे जिल्ह्याला मदत मिळवून देता देता जिल्ह्याला कोरोनाचे रुग्ण मात्र नक्कीच बहाल करत आहेत यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =