You are currently viewing “हा खेळ तारखांचा.. हा घोळ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा”…

“हा खेळ तारखांचा.. हा घोळ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा”…

कोरोनाच्या महामारीने अनेकांच जीवन उध्वस्त होत आहे. कुटुंबाची कुटुंब बाधित होत आहेत. प्रत्येकाची जगण्याची धडपड. बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही, औषधै नाहीत.. अँब्यूलन्स नाही, म्हणून रस्त्यावर, रिक्षेत किंवा एखाद्या झाडाखाली उपचारा अभावी माणसं प्राण सोडत आहे. हे या घडीचं भीषण आणि विदारकं वास्तव आहे.. कुणीही कितीही मल्लीनाथी करो. फोनवर सारखी कोरानाची लस घेण्याबाबतची टेप ऐकू येते. एखादा देशव्यापी कार्यक्रम राबावयाचा असेल तर त्यासाठी जनजागृती केली पाहिजे याबाबत दुमत असण्याचे मुळीचं कारण नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय. अशी सर्व स्तरावर प्रचार आणि प्रसिद्धी झाल्याने अगदी तरूणांपासून ऐशी वर्षाच्या जेष्ठापर्यत झुंडीच्या झुंडी आपल्याला लस मिळाली पाहिजे म्हणून लसीकरण केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून ताटकळत रांगेत उभे आहेत. अनेक लसीकरण केंद्रावर साठा संपला म्हणून निराश होवून देवावर भरोसा ठेवून निराश होवून माघारी फिरत आहे.

सोशल मिडिया, प्रिंट मिडिया आणि वाहिन्यांवर हा सावळा गोंधळ लाँकडाऊनमुळे घरात बसून पाहायला मिळतो..आणि..मला लस मिळेल का?…कधी मिळेल… अशा भितीदायक आणि चिंतातूर वातावरणात आता केद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणखीन चिंता वाढवलेली आहे.
कोवीशिल्ड या लसीबाबत सुरूवातीला असा निर्णय घेतला की पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस अठ्ठावीस दिवसांनी घ्यायचा. यानुसार काहीजणानी तो घेतला. त्यानंतर हा कालावधी वाढवून पंचेचाळीस दिवस केला. हा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय डोस दिला जात नव्हता. त्यानुसारही काहीनी डोस घेतला. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन घोषणा करून आता हा दुसरा डोस तब्बल बारा ते सोळा आठवड्यानी घ्यायचा. यामुळे सर्वसामान्याच्या मनात गोंधळ आहे तो म्हणजे लस तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने हा कालावधी वाढवला जातो का? तसेच या लसीच्या प्रभावाबाबत संबंधित तज्ञ यंत्रणेच्या मनात साशंकता आहे का? जर अठ्ठावीस व पंचेचाळीस दिवसात काही लोकांनी दुसरा डोस घेतला तर मग उर्वरित नागरिकांसाठी तब्बल ८४ते ११२दिवस वाढविण्याचे कारण काय? आणि समजा अशाने पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस मिळण्यासाठी एवढा विलंब होतो म्हणून काहीजण मानसिक तणावाखाली गेले तर काय करायचे? सरकारच्या अशा वारंवार बदलणाऱ्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांची चिंता मात्र दिवसेंदिवस वाढतचं आहे. कोवीशिल्डच्या या दोन डोसमध्ये पुन्हा पुन्हा वाढवल्या जाणाऱ्या अंतराबाबत काही वैद्यकीय कारणे/ आधार याबाबत नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे. सुरुवातीला अमुकच दिवसात दुसरा डोस घेतला पाहिजे हा आग्रह कशाच्या आधारे होता आणि आता एवढा कालावधी वाढविण्याचे कारण काय? नियोजनाचा अभाव, गैरव्यवस्थापन कि लशीचा तुटवडा?

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =