२६ वर्षीय दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. अनस मुजाहीद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना झाल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. करोनानंतर झालेल्या लक्षणांमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांचे सहकारी आणि कर्मचारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
डॉ. अनस मुजाहीद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली. त्यानंतर ते गुरू तेग बहादूर रुग्णालयात रुजू झाले होते. हे रुग्णालय करोना रुग्णांवर उपचारासाठी राखीव करण्यात आलं आहे. दिल्लीतील भागिरथी विहार येथे राहत असलेले डॉ. अनस नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले आणि आपली सेवा सुरु केली. शनिवारी दुपारपर्यंत ते रुग्णांची सेवा करत होते. त्यांना असह्य वाटत असल्याने त्यांनी रात्री ८ च्या सुमारास करोनाची चाचणी केली. त्यात त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. मात्र मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा रविवारी रात्री ३ वाजता मृत्यू झाला.
‘डॉ. अनस मुजाहीद क्लिनिकमध्ये बसले असताना अचानक कोसळले. त्यांना आम्ही तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल केलं. तेव्हा ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यांचं सीटी स्कॅन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं दिसून आलं. तात्काळ न्यूरोलॉजिकल विभागात हलवलं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला’, असं डॉ. सोहिल यांनी सांगितलं.