मटक्याचे अर्थकारण

मटक्याचे अर्थकारण

मटका लावणाऱ्यांचे घर चालेल न चालेल, पण कंपनीवाल्यांच्या माडीवर माडी चढताहेत….ऐश्वर्य दारात लोळतं

संपादकीय…..

गेल्या चार दिवसात मटक्याच्या दुकानांवर धाड पडलेल्या बातम्या यायला लागल्या, सरकारी तिजोरीत रोज चार पाच हजारांची भर पडू लागली. पण अजूनही कुठल्या मटका कंपनीच्या कार्यालयावर, मालकांच्या घरावर धाड पडलेली नाही. शहरात खुलेआम सुरू असलेली मटका कंपनीची कार्यालये बंद झालेली नाहीत अथवा त्यांच्यावर धाड पडण्याची शक्यता नाही. कारण तिथूनच तर पैशांचा मुख्य स्रोत दरदिवशी वाहत असतो. कारवाई होतेय ती फक्त शेपाचशे रुपये कमावणाऱ्या टपरीवाल्यांवर.
मटका लावणारे असो वा मटका स्वीकारणारे स्टॉल, टपरिवाले दोघांचीही परिस्थिती सर्वसामान्य असते, काहींची तर अत्यंत दयनीय. परंतु कधीतरी जॅकपॉट लागेल आणि आपण पैसे कमावू या आशेपोटी रोज पाच दहा रुपयांचा मटका लावतात. माणूस आशावादी असतो, कष्टाने कमावलेले पैसे आशेपोटीच मटक्यावर लावतात. काहींची रोजीरोटी सुद्धा चालते मटक्यावर, तर काहींना आपण लावलेला पैसा जरी आला तरी आनंद असतो. परंतु मटका लावून किंवा स्टॉल, टपरीवर मटका स्वीकारून कोणीही गडगंज श्रीमंत झाला, बंगला बांधला, प्रॉपर्टी केली, आलिशान गाडी घेतली असे ऐकिवात नाही किंवा दिसतही नाही.
अगदी याच्या विरुद्ध परिस्थिती आहे ती मटक्या व्यतिरिक्त इतर कुठलाही धंदा, व्यवसाय नसणाऱ्या मटका कंपनी चालवणाऱ्या मालक, भागीदारांची. मटका कंपनीच्या मालकांचे सावंतवाडीत दोन, तीन मजली टुमदार बंगले आहेत, नोकर चाकर आहेत. काही इमारतींमध्ये पैशांच्या गुंतवणुकीसाठी कुठल्याही बँकेचे कर्ज न घेता कॅश रक्कम देऊन घेतलेले फ्लॅट आहेत. फिरायला आरामदायी १५/२० लाखांच्या गाड्या आहेत. काहींच्या करोडोंच्या आंब्याच्या बागा आहेत, तर कोणी धंदा दाखविण्यासाठी हॉटेल्स उभारली आहेत. मटक्याचा व्यवसाय अडचणीत येऊ नये म्हणून काहीजण लाखो रुपये खर्चून लोकप्रतिनिधी बनले आहेत, म्हणजे राजकारणाचं सुरक्षा कवच आपोआपच भेटतं.
मटका कंपनीच्या मालकांचे खाजगी नोकर सुद्धा मालकांसोबत सुरमई, पापलेट खातात आणि मटका लावणारे, मटका स्वीकारणारे पैसे आलेच तर ५०/- १००/- रुपयांचा इरडाचा वाटा घेऊन घरी जातात. हॉटेलची चहा पिताना चारवेळा विचार करतात तर मटकेवाले मात्र हजारोंच्या दारू मटणाच्या पार्ट्या झोडतात. या पार्ट्याना बऱ्याचदा संबंधित असणाऱ्या खाकीचीही हजेरी असतेच. त्यामुळे मटक्याला खाकीचा आश्रय लाभला आहे असे म्हणायला हरकत नाही.
सरळ मार्गाने लोक घरं बांधू शकतात. परंतु वाममार्गाने मात्र लोक टोलेजंग बंगले बांधू शकतात हेही नसे खोटे. वाममार्गाचा पैसा सत्कारणी लागावा म्हणून दानधर्म सुद्धा करतात आणि पुण्य पदरात पाडण्याचा तसेच स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात.
मटक्याच्या धंद्यात वारेमाप पैसा मिळतो, ऐश्वर्य लाभतं, परंतु सुख, समाधान मिळते की नाही हे मात्र तेच जाणो…

क्रमशः

पुढे वाचा खांद्यावर हात ठेवून दुचाकीवर डबल सीट फिरणाऱ्यां मटका किंगचे ऐश्वर्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा