पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा सावंतवाडी शहर भाजपकडून निषेध

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा सावंतवाडी शहर भाजपकडून निषेध

शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचं तहसिलदारांना निवेदन

सावंतवाडी
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत सावंतवाडी शहर भाजपाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले. यावेळी तालुका प्रवक्ते केतन आजगावकर, योगेश गावडे आदी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आली. यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू केला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार सुरू असून आताचे राजकारण चालू झाले आहे. त्याठिकाणी तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आगी लावणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, असे अजय गोंदवळे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पश्चिम बंगालमधील या हिंसाचाराबाबत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना महामारी ची परिस्थिती लक्षात घेता पक्षाचे संतप्त कार्यकर्ते शांततामय पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून निदर्शने करतील त्यामुळे त्याबाबत योग्य ती दखल घ्यावी, असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा