स्वॅब टेस्ट दिल्यानंतर संशयित रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत राहतो घरी.

स्वॅब टेस्ट दिल्यानंतर संशयित रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत राहतो घरी.

प्रशासन का दाखल करून घेत नाही रुग्णालयात?

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग आणि प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर बरेच रुग्ण स्वॅब टेस्ट करत आहेत परंतु आर्टिपीसीआर टेस्ट चा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने मुळातच दोन तीन दिवसांनी लक्षणे जाणवल्यानंतर रुग्ण स्वॅब टेस्ट करतात व रिपोर्ट येईपर्यंत चार दिवस संशयित असूनही त्यांना प्रशासन अथवा आरोग्य विभाग रुग्णालयात दाखल करून औषधोपचार न सुरू करता वाऱ्यावरच सोडत आहे. त्यामुळे बरेच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उशिराने औषधोपचार सुरू झाल्याने गंभीर बनत आहेत, काहीजण तर आपल्या जीवास मुकत आहेत. कोविडचे संशयित टेस्ट करत नाहीत किव्हा उपचार घेण्यास पुढे येत नाहीत असाच बऱ्याच जणांचा समज आहे, परंतु प्रशासनच गंभीर नसल्याने जिल्ह्यात दिवसाकाठी रुग्णसंख्या ५०० चा आकडा पार करत आहे आणि दर दिवशी दहा ते पंधरा जिल्हावासीयांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रशासनाने रुग्ण दाखल करून न घेतल्याने असे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये राहतात आणि योग्य खबरदारी न घेतल्याने घरातील इतर व्यक्ती देखील पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
स्वॅब टेस्ट केल्यानंतर कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना जर योग्यवेळी औषधोपचार मिळाले तर नक्कीच रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होणार परंतु यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. संशयित रुग्णांसाठी वेगळा सस्पेक्टेड (सारी) रुग्ण कक्ष स्थापन केला पाहिजे. उपजिल्हा रुग्णालयात संशयित रुग्णाला दाखल करून न घेता जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो, व जिल्हा रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णाला तिथेही दाखल करून घेण्यास असमर्थता व्यक्त केली जाते. त्यामुळे अनेक रुग्ण प्राथमिक अवस्थेत व्यवस्थित असतात ते रिपोर्ट येईपर्यंत गंभीर होतात. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या निदर्शनास सदर बाब आणल्यानंतर आमदार केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांना ३/४ दिवसात सावंतवाडीत संशयित रुग्णांसाठी वेगळा सस्पेक्टेड वॉर्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
सावंतवाडीत वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता दहा दिवस कडक लॉक डाऊन करण्याबाबत दीपक केसरकर यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार तथा इतर अधिकाऱ्यांशी, व्यापारी वर्गाशी तातडीची बैठक घेत दहा दिवसांचा जनता कर्फ्यु सावंतवाडीसह दोडामार्ग,वेंगुर्ला येथे जाहीर केला.
मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटात सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हे स्वतः मैदानात उतरत लॉक डाऊन, बंद बाबत पुढाकार घेत होते, परंतु यावर्षीच्या गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढलेल्या कोरोनाच्या महामारीत सावंतवाडीचे नगराध्यक्ष कमी पडल्याचे दिसून येत असून मागच्यावेळी केसरकरांवर मुंबईत राहत असल्याबाबत टीका होत होती, तेच आमदार केसरकर आज कोरोनाच्या संकटात मैदानात उतरून समर्थपणे लोकांच्या हिताचे निर्णय घेताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी आणि शहराचे प्रथम नागरिक या नात्याने संजू परब यांनी शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या महामारीबाबत मुख्याधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून योग्य ती खबरदारी, फवारणी, शहरातील कोरोना रुग्णांचा सर्व्हे आदी कामे प्राधान्याने करणे गरजेचे होते.. परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाच कडक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे.. सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत असल्याने स्वतः आमदार केसरकर यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
सावंतवाडीत लसीचा तुटवडा हा गेला महिनाभर आहेच, त्यामुळे ४५ वर्षे वयोगटाच्या वरील लोकांना लस उपलब्ध होऊ शकलेली नाही, त्यात १८ ते४४ वर्षापर्यंत लस देणे जाहीर केल्याने उर्वरित लोकांना लस कधी मिळेल याबाबत साशंकता आहे, त्यामुळे गरजेनुसार आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप सावंतवाडीसह तालुक्यात करणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांची इम्मुनिटी तयार होईल आणि लस घेतली नाही तरी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आपली तब्बेत नीट राहील अशी सकारात्मक मानसिकता लोकांची तयार होईल त्यातून कोरोनाबरोबर लढण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये जागृत होईल.
आज सावंतवाडीत कोरोना रुग्णासह नातेवाईक राहत नसले तरी जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या दिमतीला नातेवाईक असतात, बऱ्याचदा निगेटिव्ह असणारे हेच नातेवाईक कोविड वॉर्डमध्ये फिरताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने पॉझिटिव्ह होतात व लक्षणे न दिसल्याने स्वतःच्या घरी गेल्यावर घरातील इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो, परिणामी जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काही रुग्णांना जास्त त्रास जाणवत नाहीत, परंतु जिल्हा रुग्णालयात ते दाखल असतात, असे काही त्रास कमी असणारे रुग्ण जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये जातात, बसतात, चहा नाश्ता करतात व नंतर आपल्या वॉर्डमध्ये येतात. त्यामुळे कॅन्टीनमध्ये निगेटिव्ह असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो. जिल्हाधिकारी मॅडमनी याविषयी गंभीरपणे विचार करावा व जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांचा वावर तात्काळ थांबवावा तसेच जिल्हा रुग्णालय परिसरातील उपहारगृहात पॉझिटिव्ह रुग्ण जाऊन चहा नाश्ता स्वतः करतात याबाबतही गंभीर दखल घ्यावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा