आंबोलीत मुख्यमंत्री सडक योजनेचे काम निकृष्ट असल्याचा स्थानिकांचा आरोप

आंबोलीत मुख्यमंत्री सडक योजनेचे काम निकृष्ट असल्याचा स्थानिकांचा आरोप

अधिकाऱ्यांकडून पाहणी : ग्रामस्थ आक्रमक

दर्जा सुधारा अन्यथा ठेकेदार बदलण्याचीही मागणी

सावंतवाडी

मुख्यमंत्री सडक योजनेतून दीड कोटी निधीच्या आंबोली फौजदारवाडी येथील होत असलेल्या कामाची आज अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

सदर रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असून याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अधिकारी अजित पाटील, उपअभियंता जी.एस. चव्हाण, अभियंता धर्णे यांनी भेट देत कामाची पाहणी केली. ग्रामस्थांनी ठेकेदार त्वरित बदला अशी मागणी केली. शासनाच्या पैशाची लुटमार संबंधित ठेकेदार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तीन वर्षाची हमी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराचे बिल देवू नये अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

यावेळी शशिकांत गावडे,दीपक मेस्त्री,सदस्य काशिराम राऊत, काका भिसे, हेमंत नार्वेकर आदी उपस्थित होते. “संबंधित काम हे ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून त्याची अधीक्षक अभियंता यांच्यामार्फत चौकशी व्हावी, ठेकेदार तात्काळ बदला.ठेकेदाराचे बिल तोपर्यंत देवू नये. वरिष्ठ स्तरावरून कामाची चौकशी व्हावी अन्यथा बांधकाम विभाग मुख्य अभियंता, बांधकाम मंत्री, मुख्य सचिव आणि मुख्य मंत्री यांच्याकडे कामाची चौकशी ची मागणी करून उपोषणाला बसणार असा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा