IPL 2021 रद्द

IPL 2021 रद्द

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील (IPL 2021) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला  यांनी अशी माहिती दिली आहे की, यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना त्यावेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत गेला.

हैदराबाद संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचं लोन वाढतच चालल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तूर्तास रद्द करण्यात आले असून पुढील सामन्यांवर लवकरच निर्णय होणार असल्याचं बीसीसीआयकडून राजीव शुक्लांसह सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. सामने तात्पुरत्या स्वरूपात रद्द केले असले तरी नंतर आयपीएलवर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हैदराबाद संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुरू असलेल्या आयपीएलचं पर्व सध्या तरी इथे थांबवण्यात येत आहे. परंतु पुन्हा हे सामने कधी घेतले जातील याच्याबद्दल सध्या निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचे या सिझनचे सामने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा