सिंधुदुर्गचा कोविड रणसंग्राम

सिंधुदुर्गचा कोविड रणसंग्राम

प्रश्न पैशाचा नाही, नियोजनाचा आहे – सगळ्यांना विश्वासात घेण्याचा आहे!

गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडने हैदोस घातला आहे. डोळ्यासमोरची चालती बोलती माणसे बळी पडू लागल्याने जनतेत दहशत माजली आहे. कोणत्याही संकटाशी लढताना एकजूट होण्याची कोकणची मूलभूत प्रवृत्ती, पण या संकटात लोकांनी एकत्र न येणे हीच अट मुख्य आहे.

त्यामुळे या संकटाशी कसे लढायचे हा सिंधुदुर्गातील नागरिकांना पडलेला गहन प्रश्न आहे. लढले तर पाहीजे, पण लढायचे कसे? एकतर कोरोची लक्षणे अतर्क्य रूपे घेत आहेत. त्यामुळे आदिवासी लोकांनी प्रशिक्षित सैन्यासमोर लढावे तशी अवस्था कोरोनासमोर लढतांना सगळ्यांचीच होत आहे. यशाला नेहमी बाप असतो, पण अपयश पोरकं असतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिव्हिल सर्जन हा नाक, कान, घसा यांचा तज्ज्ञ आहे, तो कोरोनाशी कसा लढणार? जिल्ह्याचा पालकमंत्री परजिल्ह्यातील आहे, त्याचे नियंत्रण कसे राहणार? आरोग्य यंत्रणेचे अपयश कसे सावरणार ?असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या सगळ्यात जनता प्रचंड गोंधळलेली आणि संभ्रमित झालेली आहे, हे सत्य आहे. पण तरीही या सगळ्यातुन मार्ग काढला पाहिजे हे ही नाकारता येत नाही. अनेक त्रुटी आणि दोषातून पर्याय काढला पाहिजे.

या संकटात कोणावर तरी नेतृत्व सोपवून त्याच्या सोबत लढणे ही आजची गरज आहे. लोकशाहीचे संकेत मान्य करून सर्वांनी पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सुदैवाने सर्वच लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार हे अनुभवी आणि मुरब्बी आहेत. ठरवलं तर काहीही करून दाखवण्याची धमक असलेले आहेत. फक्त प्रामाणिकपणे एकत्र येण्याची आणि एकमेकांवर निदान आजतरी राजकीय कुरघोड्या न करण्याची गरज आहे.

बॅ. नाथ पै सेवांगणच्या उमेश गाळवणकर यांनी कोविड युद्धात लढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराने आणि त्यांना सहाय्यभूत होत असलेल्या जनतेच्या मदतीच्या हातामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली, की सामाजिक एकी आणि मदतभाव याचा वापर करून घेतला तर खूप गोष्टी सहज साध्य होतील. शेवटी गाव करेल ते राव काय करेल, असे म्हंटले जाते ते खोटे नाही. आवश्यक आरोग्य सुविधा आणि गरजा यांचे योग्य नियोजन करून जनतेला आवाहन केले, तर कित्येक दानशूर व्यक्ती आणि संस्था जिल्ह्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणताही गडबडगोंधळ न करता काम करतील, गर्दी न करता वेल-कनेक्टेड राहतील यात कोणताही संशय असू नये. गेल्या काही दिवसात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी चालवलेले मदत कार्य, मालवणला एकट्या दत्ता सामंत यांनी दिलेली सवा लाखाहुन अधिक किमतीची औषधे ही याच विश्वासाची द्योतक आहेत. गरजांचे योग्य नियोजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणेने करण्याची गरज आहे, इथले हजारो हात त्याच्या पुर्ततेसाठी पुढे येतील. योग्य नियोजन झाले तर पर्यायदेखील सुचतील. उदाहरणच द्यायचे झाले तर पहिल्या लॉकडाऊनमध्येच स्वराज्य संस्थांचा निधी योग्य प्रमाणात खर्च करण्याची मुभा पंतप्रधानांनी दिली होती, त्याचे नियोजन नेमक्या माहितीच्या अभावी गोंधळाचेच झाले. रस्ते धुवून कोरोना पळणार नाही हे उशिरा कळले. मास्कवाटप, हॅन्डसॅनिटर यातली अंदाधुंदी उपलब्ध निधीला योग्यप्रकारे खर्च करण्यात अडचणीची ठरली हे वास्तव आहे. खनिकर्मचा निधी खर्च करण्याची मुभादेखील त्याचवेळी देण्यात आली होती. पण….

आता हा “पण” दूर करण्याची आणि जनतेचा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आता जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून उदय सामंत यांनी घेण्याची गरज आहे. थोडा लहानपणा घेत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज आहे. एकत्र नियोजनातून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल. जसे खनिकर्मच्या निधीतून जिल्ह्यासाठी बारा अत्यंत सुसज्ज एम्ब्युलन्स खरेदी करण्याचा स्वागतार्ह निर्णय झाला आहे. एकत्र नियोजन झाले आणि राजकारण दूर ठेवले गेले तरच खूप गोष्टी शक्य होणार आहेत. नाहीतर सगळ्या अनागोंदीत मरणार आहेत ती फक्त सामान्य माणसे! बाकी अनेकजण आजच्यासारखेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यातच धन्यता मानतील. कोरोनाचा बागुलबुवा दाखवत लोकांच्या तोंडावर आणि डोळ्यावर फार काळ पट्टी बांधता येणार नाही याचीही जाणीव काहींनी ठेवणे गरजेचे आहे. आज हे गैरप्रकार हा या लेखाचा उद्देश नाही, म्हणून हा विषय कटाक्षाने टाळूया. पण जनतेचा विश्वास मिळवता आला तर कोणत्याच अडचणींवर विजय मिळवणे अजिबात अशक्यप्राय नसेल, मात्र जनतेला चुकीच्या गोष्टी समोर आल्या आणि विश्वास उडाला, तर सिंधुदुर्ग बुडाला हे निश्चित. फक्त शासकीय यंत्रणा या संकटाविरोधात नाही लढू शकत, ही काळ्या दगडावरची रेषा आहे. परिस्थिती कठीण असली तरीही हाताबाहेर आजही गेलेली नाही. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासाठी हे संकट म्हणजे नेतृत्व सिद्ध करण्याची आणि जबाबदारी निभावण्याची संधीसुद्धा आहे. राजकारणापलीकडे जात, ते या कार्यात यशस्वी व्हावेत असे वाटते. कारण प्रश्न इथल्या सर्व बाजूंनी हतबल झालेल्या सामान्य जनतेच्या जीवन-मरणाचा आहे!!

©️अविनाश पराडकर@सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा