बाळांनो, आम्ही लगेच येतो…

बाळांनो, आम्ही लगेच येतो…

कोरोना उपचाराला गेलेले दाम्पत्य परतलेच नाही

चिमुकल्यांना आईबाबा गेल्याचा पत्ताच नाही

कोल्हापूर :

पती पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कामाला,पत्नी देखील खाजगी कंपनीत चांगल्या पदावर. या संसारवेलीवर दोन मुलं असं हे चौकोनी सुखी कुटुंब. मात्र कोरोनाने अवघ्या चार दिवसात कुटुंबाची वाताहात केली. आधी पत्नीचा आणि नंतर पतीचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू दोन चिमुकल्यांच छत्र हिरावून गेला.

ही कहाणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर पैकी मलकापूर मधल्या पाटील कुटुंबीयांची. महादेव पाटील हे पुण्यातील एका मोठ्या कंपनीत होते. तर त्यांची पत्नी खाजगी कंपनीत चांगल्या पदावर होती. कामाच्या निमित्ताने आपल्या नऊ वर्षाची मुलगी पूर्वा आणि सहा वर्षाचा मुलगा तन्मय यांच्यासोबत हे दाम्पत्य पुण्यातच स्थायिक झालं होतं.

दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

सगळं सुरळीत सुरु असताना पुण्यात कोरोनाचा कहर वाढला आणि महादेव पाटील यांची कंपनी काही दिवसासाठी बंद झाली. कोरोनामुळे असुरक्षित झालेलं वातावरण आणि सुट्टीमुळे महादेव पाटील कुटुंबियांसोबत शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर येथे आपल्या मूळ गावी आले. दोन दिवसातच पत्नी सीमा पाटील यांना त्रास जाणवू लागला. दोघांनीही खबरदारी म्हणून कोरोना टेस्ट केली आणि दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली.

आधी पत्नीचा मृत्यू, मग पतीनेही जीव सोडला

आपल्या दोन्ही मुलांना नातेवाईकांकडे सोडून महादेव आणि सीमा पाटील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र उपचार सुरू असतानाच दोन दिवसापूर्वी सीमा पाटील यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या महादेव पाटील यांना ही काल रात्री मृत्यूनं गाठलं आणि एका क्षणात पूर्व आणि तन्मयचं मातृ-पितृ छत्र हरपलं. उपचारासाठी जाताना आम्ही लवकर परत येऊ असा शब्द देऊन गेलेले पूर्व आणि तन्मयचे आई-बाबा घरी आलेच नाहीत.

अख्ख्या कुटुंबाची वाताहात

चांगली नोकरी,घर,गाडी सुखी कुटुंब असं आयुष्य असलेल्या पाटील कुटुंबीयांची कोरोनाने अवघ्या काही दिवसात केलेली वाताहत मन हेलावून टाकणारी आहे. पूर्व आणि तन्मय या दोघाही चिमुकल्यांना अजूनही नातेवाइकांनी त्याचे आई-बाबा या जगात नाहीत याची कल्पना दिलेली नाही. आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले हे कळल्यावर चिमुकल्यांची काय अवस्था होईल याच विचाराने नातेवाईकही अस्वस्थ आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा