You are currently viewing सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा; आमदार नितेश राणे

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा; आमदार नितेश राणे

जनतेचा अँटीजन टेस्टवर विश्वास नाही आरटीपीसीआर टेस्टच करा

आम. राणे यांचे प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार

कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा. देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे. त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा असे पत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाला दिले आहे. तर जनतेचा अँटीजन टेस्टवर विश्वास नाही त्यामुळे जास्तीजास्त आरटीपीसीआर टेस्ट करा असे सूचित केले आहे.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर याना प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू करण्यासाठी आज दुसऱ्यांदा आमदार नितेश राणे यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, सद्याच्या कोरोना महामारीच्या आजाराने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर शासनाकडून विविध उपाय योजनांद्वारे आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . त्या अनुषंगाने मी दिनांक २ ९ जून २०२० रोजीच्या पत्राद्वारे प्लाझ्मा थेरपीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांना उपचार करण्याची सूचना केली होती . त्यावर अद्याप काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही . सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० % आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करून त्याद्वारे कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार झाल्यास आजार आटोक्यात येऊ शकतो. तरी याबाबत गंभीरपणे त्वरीत निर्णय घ्यावा असे पत्रात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे सद्या कोरोना संशयित असलेल्या रुग्णांची अँटीजन(ANTIGEN) तपासणी करण्यात येते, परंतु सदर पद्धती ही सदोष असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून या म्हणण्यास पूरक अशा घटना घडल्या आहेत . त्यामुळे कोरोना संशयित रूग्णांची जास्तीत जास्त RT – PCR तपासणी करण्यात यावी , अशी मागणी जनतेकडून होत आहे . त्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे . तरी वरील दोन्ही विषयांबाबबत आपले स्तरावरून त्वरीत कार्यवाही व्हावी असे पत्राद्वारे आम.नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा