You are currently viewing गोव्यात लाॅकडाऊन घोषित झाल्याने पर्यटकांचा परतीचा प्रवास…

गोव्यात लाॅकडाऊन घोषित झाल्याने पर्यटकांचा परतीचा प्रवास…

सटमटवाडी तपासणी नाक्यावर गर्दी ; ई-पास पाहूनच महाराष्ट्रात प्रवेश…

बांदा

आज रात्रीपासून गोवा राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने गोव्यातील पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे आज सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी होती. तपासणी नाक्यावर ई-पास पाहून या वाहनांना महाराष्ट्र राज्यात प्रवेश देण्यात येत आहे. आज सकाळपासून पत्रादेवी-गोवा सीमेवर गोवा पोलिसांकडून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता केवळ अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पत्रादेवी नाक्यावरील पोलिसांनी स्पष्ट केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गुरुवारी रात्री ७ ते सोमवारी दिनांक ३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर गोवा पोलिसांकडून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी नाक्यावर नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज सायंकाळी ७ नंतर गोव्यात अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण प्रवेश करणाऱ्यांना सिमेवरच रोखण्यात येणार आहे.
कदंबा बससेवा पत्रादेवीपर्यंत
आजपासून गोव्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गोवा परिवहन महामंडळाच्या कदंबाची बससेवा पत्रादेवीपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. आज पणजी-सावंतवाडी बस पत्रादेवी सीमेवर थांबविण्यात आली. याठिकाणी प्रवाशांना उतरून बस पुन्हा माघारि मार्गस्थ झाली. त्यामुळे बांदा, सावंतवाडी येथे जाणाऱ्या प्रवाशांचे भर उन्हात हाल झालेत.
गोव्याने लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज सकाळपासून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + two =