You are currently viewing रास्तदराच्या धान्य दुकानातील वितरण १ मे पासून बंद

रास्तदराच्या धान्य दुकानातील वितरण १ मे पासून बंद

राज्यस्तरीय बंदला सावंतवाडी तालुका संघटनेचा पाठींबा

मागण्यांबाबत शासनाकडून प्रतिसाद नसल्याचा आरोप

सावंतवाडी

कोरोना महामारीच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा देणाऱ्या रास्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यस्तरीय संघटनेने घेतलेल्या धान्य वितरण बंदमध्ये सावंतवाडी रास्त धान्यदुकानदार संघटना सहभागी होणार असून १ मे पासून तालुक्यातील एकही धान्य व केरोसीन दुकान सुरू राहणार नाही अशी माहीती संघटनेचे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांनी दिली.

सावंतवाडी तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी यावेळी संघटनेचे सचिव संजय मळीक पंढरीनाथ गावकर उदय फेंद्रे तन्वी परब, संगीता कोकरे, भास्कर सावंत, प्रवीण गवस, शिवा लाड, रोहिणी गावडे, अनिकेत रेडकर, शिवराम गाड,संतोष देवगुरव आदी उपस्थित होते.

राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार कोरोना महामारीच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसताना तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळताही कोरोना महामारीच्या काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता धान्य वाटप करीत आहेत. मोफत धान्यही शासन नियमाप्रमाणे गावागावात वाडीवस्तीवर नेऊन वाटप करण्यात आले. मात्र, त्यावेळेचे गाडी भाडेही अद्याप मिळालेले नाही. तसेच केवळ ई पॉस मशीनवर कार्ड धारकाचे थम न घेता धान्य दुकानदारांच्या थमने धान्य वाटपास परवानगी मिळावी या मागणीलाही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

यासाठीच राज्यस्तरीय संघटनेकडून नाईलाजास्तव १ मे पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचे धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या राज्यस्तरीय संपात तालुक्यातील धान्य दुकानदार संघटना सहभागी होणार असुन १ मे पासून तालुक्यातील सर्व धान्य दुकाने केरोसीन दुकाने बंद राहणार आहेत, माहितीही यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा