You are currently viewing कॅथॉलिक अर्बन १८६ कोटी ठेवींचा टप्पा पार

कॅथॉलिक अर्बन १८६ कोटी ठेवींचा टप्पा पार

सर्वसाधारण सभेत देव्या सूर्याजींचा यांचा सन्मान

 

सावंतवाडी :

 

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने ३१ मार्च अखेर १८६ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. लवकरच २०० कोटी ठेवींचा टप्पाही संस्था पार करेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी व्यक्त केला. सातत्यपूर्ण कर्ज वसुली, २ कोटी १० लाख निव्वळ नफा, ४० टक्केच्या घरात असलेली संस्थेची गुंतवणूक, १३१ कोटी कर्ज आणि संस्थेला आदर्श ठरावी व अभिमान वाटावा, अशी सर्व आदर्श प्रमाण संस्थेने राखली असल्याचे ते म्हणाले.

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथील नवसरणी केंद्र येथे झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून येथील मिलाग्रीस चर्चचे पॅरीश प्रिस्ट फादर मिलेट डिसोजा उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला फादर डिसोजा यांनी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य संपादन केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

युवा रक्तदाता म्हणून ज्यांची ओळख आहे, ते सावंतवाडीतील दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांच्या समाजसेवेची दखल घेऊन संस्थेच्या सर्व सभासदांच्यावतीने अध्यक्ष व फादर डिसोजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूर्याजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.संस्थेने आजपर्यंत २९ वर्षांची व्यवसायाची कटिबद्धता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे.

आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग ‘अ’ची परंपरा कायम राखली आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता, संस्थेवरील सभासद ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाल्यामुळे आज मोठ्या स्वरुपाच्या ठेवी संस्थेकडे जमा होत आहेत. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेने १८६ कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून लवकरच २०० कोटी ठेवीचा टप्पा पार करेल. सातत्यपूर्ण कर्ज वसुली, २ कोटी १० लाख निव्वळ नफा, ४०% च्या घरात असलेली संस्थेची गुंतवणूक १३१ कोटी कर्ज तसेच संस्थेला आदर्श ठरावी व अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाण संस्थेने राखली आहे.

संस्थेने राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या नेट बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सहकार क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला असल्याचे अध्यक्ष डॉन्टस यांनी सांगितले. चालूवर्षी देखील सभासदांना १४ टक्के लाभांश मंजूर करण्यात आला आणि सभा सुरू असताना नेट बँकिंगच्या सहाय्याने तो लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आला. याबाबत सभासदांनी आनंद व्यक्त करत संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

फादर मिलेट डिसोजा यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. इतिवृत वाचन एवरिस्ट मेंडीस, अहवाल वाचन सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस यांनी केले. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमम रुजाय रॉड्रिक्स यांनी मानले. फॅकी डॉन्टस यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा