ताफ्यातील दोन गाड्या दिल्या रुग्णांना
कणकवली
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत असून, प्रशासकीय यंत्रणा देखील वाढत्या रुग्ण संख्येमुळे अपुरी पडत आहे. अशा स्थितीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दिलासा देणारा निर्णय कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी जाण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी चक्क आपल्या ताफ्यातील एक बोलेरो गाडी जिल्हा रुग्णालयाकडे कोरोनामुक्त रुग्णांना घरपोच सेवेसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील कालपासून सुरू करण्यात आली.
आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला असून, छोटू पारकर मित्र मंडळ ओरोस यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना अनेकदा कोरोना पॉझिटिव्ह या नजरेतूनच पाहिले जाते यामुळे घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होत नाही, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त रुग्णांना वेळेत घरी पोहोचता यावे व या रुग्णांना कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तसेच येत्या काळात आवश्यकता भासल्यास ताफ्यातील दुसरी स्वत: वापरत असलेली गाडीदेखील कोरोनामुक्त रूग्णांच्या घरपोच सेवेसाठी देणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोरोना विरोधातील या युद्धात कोविड योध्याच्या भूमिकेत आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सेवेसाठी जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णानी अमित भोगले- 8411837015 व महेश उर्फ छोटू पारकर – 9422373743 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.