ग्रामीण रुग्णालयाचे शवागर सुरू करा…

ग्रामीण रुग्णालयाचे शवागर सुरू करा…

गणेश कुशे यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष ; लसीकरणासाठी मनुष्यबळ वाढविण्याची मागणी…

मालवण

शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे असे असताना मात्र येथील ग्रामीण रुग्णालयाचे शवागर (मॉचरी) सुविधा गेली दोन वर्षे बंदस्थितीत आहे. त्यामुळे कोरोनाचा मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांची गैरसोय होत आहे. याप्रश्नी आज झालेल्या पालिकेच्या ऑनलाईन सभेत पालिकेचे गटनेते गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय मृतांची आकडेवारीही वाढत आहे असे असताना ग्रामीण रुग्णालयाचे शवागर बंद आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवण्यास सुसज्ज जागा नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी विनंती करावी लागत आहे. मात्र जिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण असल्याने मृतदेहांची हेळसांड होत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन हे शवागर सुरू करण्याची सूचना श्री. कुशे यांनी केली.
सध्या शहरासह ग्रामीण भागातील ४५ वर्षावरील नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालयात लस देण्यात येत आहे. ही लस घेण्यासाठी सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र लस देण्यासाठी मनुष्यबळ फारच कमी असल्याने यंत्रणेवर ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लस देण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी श्री. कुशे यांनी केली. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही श्री. कुशे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा