– शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब
वेंगुर्ला
वेंगुर्ला-राऊळवाडा येथील ब्रीज कम बंधा-याचे काम हे नियमबाह्य असून सदरच्या बंधा-याची प्रशासकीय मान्यता त्वरित शासनाने रद्द करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.
यावेळी परब म्हणाले की, वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानाच्या बक्षीस रक्कमेतून राऊळवाडा येथील ओहोळावर ब्रिज कम बंधा-याचे काम हाती घेतले आहे. राज्याचे नगरपरिषद विकास विभागाचे पधान सचिव यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या संदर्भात नगरविकास खात्याने फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या प्रशासकीय पत्रामध्ये सदर काम करावयाचे असल्यास जलसंपदा विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची अट घातलेली होती. पण नगरपरिषदेने सदरच्या अटीला बगल देत ते काम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी ७९ लाख ५२ हजार ७४३ रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे. याच बंधा-यापासून ४० मीटरवर असलेल्या बंधा-याला जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री उदय सामंत यांनी २० लाख रुपये मंजूर केलेले आहेत व त्या कामाचे टेंडरही प्रसिद्ध झाले आहे.
४० मीटरवर असलेला बंधारा जर २० लाखात होत असेल तर या बंधा-यासाठी ८० लाखांची गरज काय? त्यामुळे सदर बंधारा बांधण्याचे काम त्वरित शासनाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एखाद्या बंधा-यापासून १०० मीटर अंतरावर दुसरा बंधारा बांधता येत नाही. असा शासकीय नियम असताना, सदर नियम धाब्यावर बसवून नगरपरिषदेकडून पैशाची उधळपट्टी होत आहे.
राऊळवाडा येथील रहिवाशांनी सदर ब्रीज कम बंधा-याची कोणतीही आवश्यकता नाही, असे निवेदन नगरपरिषदेकडे दिले आहे. तरीही नगरपरिषदेकडून पैशांची उधळपट्टी करून बंधा-याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केला आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, म्हाडा विभागीय सदस्य सचिन वालावलकर, सुरेश भोसले, अभि मांजरेकर उपस्थित होते.