पोंभूर्ले जि. प. मतदार संघातील शाळांवर होतोय अन्याय; प्रदिप नारकर

पोंभूर्ले जि. प. मतदार संघातील शाळांवर होतोय अन्याय; प्रदिप नारकर

“५ मे पासून जि.प.सीईओ कार्यालयाबाहेर करणार आमरण उपोषण”

पोंभूर्ले जि. प. सदस्य प्रदिप नारकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग

जिल्हा वार्षिक योजना आराखड्यामध्ये पोंभुर्ले जि. प. मतदार संघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकाम व दुरूस्ती जाणुनबुजून समाविष्ट न केल्यामुळे बुधवार दि. ५ मे २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत मी स्वतः व विभागातील ग्रामस्थ उपोषणास बसणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास आपले प्रशासन जबाबदार राहिल.” असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा, देवगड तालुक्यातील पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्य प्रदिप नारकर यांनी दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग, यांच्या नावे पाठविलेल्या या पत्रात नारकर यांनी खालील मुद्दे उपस्थित केले.

१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाद भोळेवाडी सन २०१९ मध्ये पावसाळ्यात कोसळली. सदर शाळा रात्रीच्या मुसळधार पावसात कोसळल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना कोणती इजा झाली नाही. सदर शाळेतील विद्यार्थी शेजारील अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सुचना उपस्थित केली असता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सदर शाळा प्राधान्यक्रम यादीमध्ये घेण्यात येईल असे सांगितलेले होते. परंतु मा. पालकमंत्र्यांना पाठविलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामधील यादीमध्ये इमारत बांधकाम करण्यासाठी सदर शाळेचा समावेश करण्यात आलेला नाही.

२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फणसगांव गुरवभाटले ही जिल्ह्यातील दुर्गम शाळेपैकी एक शाळा असून सदर शाळेचे बांधकाम सन १९९२-९३ मध्ये ग्रामस्थांनी अंगमेहनत करून केलेले आहे. त्यानंतर शाळेची विशेष दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे बांधकाम विभागामार्फत उप अभियंता व संबंधित अधिकारी यांनी सन २०१९ रोजी सदर शाळा निर्लेखित केलेली होती. याबाबतही जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सुचना उपस्थित केली असता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सदर शाळा प्राधान्यक्रम यादीमध्ये घेण्यात येईल असे सांगितलेले होते. परंतु मा. पालकमंत्र्यांना पाठविलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामधील यादीमध्ये इमारत बांधकाम करण्यासाठी सदर शाळेचा समावेश करण्यात आलेला नाही.

3)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरूस्तीकरीता खालीलप्रमाणे शाळांची नावे देण्यात आली आहेत :

१ – जि. प. प्राथमिक शाळा, धालवली मराठी शाळा
२ – जि. प. प्राथमिक शाळा, धालवली उर्दू शाळा
3 – जि. प. प्राथमिक शाळा, गवाणे
४ – जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, नाद नं. १
५ – जि. प. प्राथमिक शाळा, महाळुंगे देवळेकरवाडी

‘सदर शाळांच्या बांधकाम व दुरुस्ती करता पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून जिल्हा परिषद सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. तसेच पं. स. देवगड गट शिक्षणाधिकारी यांच्याही प्राधान्यक्रम यादीमध्ये सदर शाळांचा समावेश आहे. सदर यादी मा. पालकमंत्र्यांना देणे आवश्यक आहे. परंतु सदर आदेशाची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेपर्यंत जिल्हा परिषद कार्यालयासमोर सदर विभागातील ग्रामस्थांसोबत मी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.’ अशी माहिती प्रदिप नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा