You are currently viewing कोरोनाला भरते धडकी, असे आमुचे गाव धामडकी!

कोरोनाला भरते धडकी, असे आमुचे गाव धामडकी!

ठळक मुद्दे शिक्षकांची जनजागृती : आदिवासी पाडा कोरोनापासून कोसो दूर

 

वैतरणानगर : ना गावात जायला धड रस्ता आणि प्यायला पाणीही. कोरोनाच्या धडकी भरवणाऱ्या बातम्या पाहायला फोनला नेटवर्क नाही…अर्धवट ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावरचे मेसेजेस नाहीत… पण गावातल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळणारे इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ह्या आदिवासी वाडीचे ग्रामस्थ आहेत. कोरोना आल्यापासून धामडकीवाडीमध्ये शिक्षक जीव ओतून प्रशासनाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे राज्यभरात सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना धामडकीवाडी कोरोनापासून कोसो दूर आहे.

शिक्षकांच्या जनजागृतीमुळे कोरोना लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला गैरसमजसुद्धा निघाला असून शुक्रवारी येथील ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने लस घ्यायलासुद्धा जाणार आहेत. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रमोद परदेशी यांच्या काळजीने ग्रामस्थ रोगमुक्त जीवन जगत आहेत. संपूर्ण लॉकडाऊन काळात ह्यटीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्नह्ण राज्यभर चर्चिला गेला. ह्या उपक्रमाचे श्रेयसुद्धा इथल्या शिक्षकांसह सजग ग्रामस्थांना द्यावे लागेल.

 

इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या भावली धरणाच्या काठावर आदिवासी ग्रामस्थांची धामडकीवाडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावात जाण्यासाठी १ किलोमीटरची पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा येथील ग्रामस्थ आटापिटा करतात. विशेष म्हणजे ह्या गावात मोबाईल फोनला नेटवर्क नाही. सगळ्या जगात कोरोनाच्या हाहाकारापेक्षा सोशल मीडिया, बातम्यांचे चॅनेल यावर जास्त कहर आहे.

 

धामडकीवाडी पॅटर्न प्रसिद्ध

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी हे प्रत्येक ग्रामस्थांच्या घरातील सदस्य बनलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कोरोना विरोधात प्रभावी जनजागृती केली. इथल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परदेशी यांनी ह्यटीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्नह्ण सुरू केला होता. ह्या उपक्रमामुळे ही वाडी राज्यभर प्रचलित झालेली आहे.

 

गृहभेटी देऊन जनजागृती

फेब्रुवारीपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनमान धोक्यात आलेले आहे. म्हणून इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्या सूचनेनुसार गावागावात कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार धामडकीवाडी येथेसुद्धा सर्वेक्षण करून कोरोना आजाराची माहिती आणि जनजागृती करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक प्रमोद परदेशी व सहकारी शिक्षक दत्तू निसरड यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकूळ आगीवले, बबन आगीवले, खेमचंद आगीवले ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगीवले यांच्या सहकार्याने गृहभेटी देऊन जनजागृती सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + sixteen =