खरीप हंगामासाठी खत कमी पडणार नाही: मंत्री दादा भुसे

खरीप हंगामासाठी खत कमी पडणार नाही: मंत्री दादा भुसे

कुडाळ

राज्य सरकार शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठीशी असून शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतीसह अन्य पिकांचे भरघोस उत्पन्‍न घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी. चालू वर्षी खरीप हंगामात खतांचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सर्वत्र खतपुरवठा मुबलक प्रमाणात केला जाईल, अशी माहिती कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी कुडाळ येथे दिली.

ना. भुसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कुडाळ एमआयडीसी येथील बांबू – चिवार केंद्रात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत रिसोर्स बँकमधील शेतकर्‍यांशी संवाद कार्यक्रम पार पडला.

यावेळी ना. भुसे यांनी ही माहिती दिली. आ. वैभव नाईक, विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, कृषिमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रफिक नाईकवडी व सुधाकर बोराळे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प.सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, कॉनबॅक संचालक मोहन होडावडेकर, जिल्हा कृषी अधिकारी सिद्धाण्णा म्हेत्रे, सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी प्रवीण कोळी, तहसीलदार अमोल पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पं.स.कृषी अधिकारी प्रफुल्‍ल वालावलकर, शेतकरी सल्‍ला समिती कुडाळ अध्यक्ष बाजीराव झेंडे, मंडळ कृषी अधिकारी एस. बी. दोलताडे आदींसह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

राज्यातील प्रगतशील शेतकर्‍यांच्या ज्ञानाचा, त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा सर्व शेतकर्‍यांना फायदा व्हावा, या हेतूने शासनाने रिसोर्स बँकची संकल्पना निर्माण केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात काम करणार्‍या प्रगतशील शेतकर्‍यांच्या रिसोर्स बँक या योजनेतील निवडक शेतकर्‍यांसोबत ना.भुसे यांनी गुरुवारी संवाद साधला. खरीप हंगामाचा आराखडा बनविण्याच्या कामी आढावा म्हणून शेतकर्‍यांची मते जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत यावर्षीच्या खरीप हंगामात खतांचा पुरवठा कमी पडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. सर्व कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महिला शेतकर्‍यांसाठी 30 टक्के आरक्षण असून महिला शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आंबा, काजू तसेच खरीप हंगामातील समस्या, उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. कोकणातील चार जिल्ह्यांची बैठक रत्नागिरी येथे होत असून या बैठकीत शेतकर्‍यांनी मांडलेल्या समस्यांसंर्भात उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासित केले.हापूसच्या नावाखाली केरळातील आंबा विकला जात असल्याचे शेतकर्‍यांनी ना.भुसे यांच्या निदर्शनास आणून देत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.

आ.वैभव नाईक यांनीही मार्गदर्शन केले. कुडाळ तालुका कृषी विभागाने राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या अल्बमचे प्रकाशन ना.भुसे व आ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा