You are currently viewing कोरोनाने नव्हे इतर आजारांनी होताहेत मृत्यू…

कोरोनाने नव्हे इतर आजारांनी होताहेत मृत्यू…

सावंतवाडीतून डॉ.चितारींची बदली केल्याने फिजिशियन अभावी रुग्णांची होते गैरसोय.

संपादकीय :

सावंतवाडी कुटीर रुग्णालयात सावंतवाडीतील मूळ असणारे डॉ.चितारी रुजू झाल्यापासून रुग्णालयाला उर्जितावस्था आली होती. गेली काही वर्षे सावंतवाडीच्या आजूबाजूच्या रुग्णांना डॉ चितारींचा आधार होता, उठसुठ सावंतवाडीतून अगदी ताप सर्दीचे रुग्ण सुद्धा गोव्यात पाठविले जायचे, परंतु हृदयविकार तज्ञ डॉ चितारी सावंतवाडीत रुजू झाल्यावर अति गंभीर रुग्ण वगळता हृदयरोगी रुग्णांवर तात्काळ इलाज होत होते. त्यामुळे सावंतवाडीकरांसाठी डॉ चितारी म्हणजे देवदूतच ठरले होते.
डॉ.चितारी सावंतवाडीत आल्यापासून अनेकांना जीवनदान मिळाले होते, गोरगरीब रुग्ण जे बाहेरगावी जाऊन इलाज घेऊ शकत नव्हते त्यांना आधार वाटायचा तो डॉ.चितारीचाच. परंतु गेल्या चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ डॉ.चितारींना जिल्हा रुग्णालयात बदलीवर पाठविण्यात आले आहे. सावंतवाडीतून अनेकांनी आंदोलने केली परंतु लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचंच काम आरोग्य प्रशासनाने केले आहे. जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टर सेवा देण्यासाठी रुजू होऊनही सावंतवाडीकरांचा एकमेव आधार असलेले डॉ.चितारी यांना जिल्हा रुग्णालयात बदलीवर पाठविल्याने गेल्या चार दिवसात कोरोनाने नव्हे तर हृदयविकाराने सावंतवाडीत झालेले मृत्यू चटका लावून गेलेत.

सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात श्वास घेण्यासाठी त्रास असणे अथवा हृदयविकाराचा जरी रुग्ण असेल तर त्याला सेवा न देता कुटीर रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु कुटीर रुग्णालयात स्पेशालिस्ट असलेले डॉ.चितारी नसल्याने योग्य उपचाराभावी रुग्ण दगावले जात आहेत. एखादी रुग्णास धाप लागली, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास असला तर रुग्ण कोरोनाचाच म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालया पर्यंत पोचेस्तोवर रुग्ण दगावतो किव्हा तिथल्या भयावह परिस्थितीस घाबरून वयस्कर रुग्ण जीव गमावतो.

डॉ.चितारींची बदली केल्यानंतर गेल्या चार दिवसात घडलेल्या घटनांचा विचार करता जिल्हा आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाने मरणाऱ्यांच्या संख्येच्या कितीतरी पट जास्त रुग्ण इतर आजारांनी मृत्यूला कवटाळत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारपुढे सत्ताधारीच पक्षांना उपोषणे करावी लागत आहेत.

सावंतवाडीत होत असलेले सर्वसाधारण आजारांचे मृत्यूचे प्रमाण पाहता जिल्हा आरोग्य यंत्रणा सावंतवाडीकर जनतेच्या आरोग्य सुविधांचा विचार करून डॉ. चितारींना पुन्हा कायमस्वरूपी सावंतवाडीत रुजू करणार की सावंतवाडीकर जनतेस आंदोलनात्मक भूमिका पार पाडायला लावणार हे येणारा काळच ठरविणार…!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =