You are currently viewing देवालयांचे दरवाजे भाविकांसाठी पुन्हा बंद

देवालयांचे दरवाजे भाविकांसाठी पुन्हा बंद

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सुरू करण्यात आलेली देवालये आता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असणाऱया कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील सर्व तीन हजार 42 मंदिरे आजपासून भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यासह पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि नगर जिह्यातील साईबाबा व शनिमंदिरही 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

कोल्हापूर – राज्यातील परिस्थिती पाहाता, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत समितीच्या अखत्यारीतील कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील सर्व 3 हजार 42 मंदिरे भाविकांना दर्शनासाठी 30 एप्रिलपर्यंत व राज्य शासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत मंदिरातील पूजा, आरती आदी दैनंदिन धार्मिक विधी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहनही देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शुकशुकाट

पंढरपूर – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नव्या लॉकडाऊन धोरणानुसार सर्व धर्मीय धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून 30 एप्रिलपर्यंत पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असली तरी मंदिरातील नित्यपूजा परंपरेनुसार सुरू ठेवण्यात येणार आहेत. मंदिरे 25 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने भाविकांनी दर्शनाला येण्याचा अट्टाहास करू नये, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी केले आहे.

साई मंदिरही दर्शनासाठी बंद राहणार

शिर्डी – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या नवीन धोरणांतर्गत 30 एप्रिलपर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. याशिवाय साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व पॅन्टीनसुद्धा बाहेरून येणाऱया भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जोतिबाची चैत्री यात्रा; अंबाबाईचा रथोत्सवही रद्द

26 एप्रिल रोजी होणारी जोतिबा डोंगरावरील श्री जोतिबाची चैत्र यात्रा तसेच दुसऱया दिवशी होणारा करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सवही रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून रथोत्सवाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शनिशिंगणापुरातील गुढीपाडवा उत्सव रद्द

सोनई – शनिशिंगणापूर येथील शनिदर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले असून, गुढीपाडवा उत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. दरम्यान, मागील काही महिन्यांत शनिदर्शनासाठी भाविकांची अत्यल्प गर्दी पाहावयास मिळाली. पुन्हा मंदिर बंद झाल्याने व्यावसायिकांना मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − twelve =