You are currently viewing वागदेत कंटेनर अपघातात एक ठार; एक गंभीर!

वागदेत कंटेनर अपघातात एक ठार; एक गंभीर!

 एकाच लेनमुळे होत आहेत वारंवार अपघात!

कणकवली

गोवा ते अहमदाबाद औषधे घेऊन जात असलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटून कंटेनर दुभाजकावर चढून पलटी झाला. यात खुश्मीन आझाद खान (17) आणि चालक मुनफेर समसू खान (30, दोन्ही रा. राजस्थान) हे गंभीररित्या जखमी झाले. दोघांनाही कणकवली उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येेथे हलविण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान खुश्मिन खान याचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी मध्यरात्री 12 वा. च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वागदे नाईक पेट्रोलपंपानजीक घडला. वागदेत गडनदी पूल ते गोपुरी आश्रमापर्यंत एकच लेन असल्याने वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत.

गोव्यावरून कंटेनरचालक मुनफेर खान हा अहमदाबादच्या दिशेने जात असताना वागदे पेट्रोलपंपानजीक वळणावर एकाच लेनवर येताना डिवायडरवर चढून अपघात झाला. वागदे गोपुरी आश्रम ते गडनदी पूलापर्यंत एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. काही दिवसांपूर्वी असाच अपघात वागदे गडनदी पुलानजीक घडला होता. अपघातात मयत झालेला खुश्मिन खान हा ट्रकचालकाचा भाऊ असून तो गोवा बघण्यासाठी आला होता. मात्र गोवा पाहून घरी परतताना त्याला मृत्यूस सामोरे जावे लागले. खुश्मिन याचा डावा पाय गुडघ्याखाली तुटून घटनास्थळी पडला होता, तर वर पूर्ण पाय फ्रॅक्‍चर झाला होता. अतिरक्‍तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. अपघातानंतर पोलिस हवालदार रविकांत झरकर, पोलिस नाईक किशोर पाडावे, पोलिस कॉन्स्टेबल सुमित चव्हाण, ग्रामस्थ, महामार्ग पोलिस घटनास्थळी होेते.

प्रतिक्रिया व्यक्त करा