सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ५००० योगा अभ्यासकांचे भव्य शिबिर
रामदेव बाबांचे परम शिष्य पूज्य स्वामी परमार्थ देवजी यांचे सावंतवाडीत स्वागत
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग शाखेच्या योग अभ्यासकांना मार्गदर्शन
- सावंतवाडी:
स्वामी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ५००० योगा अभ्यासकांचे भव्य शिबिर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती स्वामी रामदेव बाबांचे परम शिष्य पूज्य स्वामी परमार्थ देवजी यांनी दिली. पतंजली योग समितीच्यावतीने सावंतवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वामी परमार्थ देवजी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला रोगमुक्त करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी घरोघरी योगा शिकवला जाणार आहे. येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनापूर्वी संपूर्ण जिल्हा योगामय करण्याचा संकल्प पतंजली योग समितीने केला आहे.
कुडाळ येथे पतंजली योग पीठतर्फे आयोजित योगाभ्यास प्रशिक्षण वर्गाला भेट दिल्यानंतर स्वामी परमार्थ देवजी यांनी सावंतवाडीत रवींद्र प्रभू देसाई यांच्या निवासस्थानी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग शाखेच्या योग अभ्यासकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना स्वामी परमार्थ देवजी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात योगा अभ्यासाचे काम उत्तम सुरू आहे. आज प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रोगाने त्रस्त आहे. कोरोना महामारीनंतर तर रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि औषधोपचारांनीही ती पूर्णपणे बरी होताना दिसत नाही. अशा स्थितीत रोगमुक्त होऊन सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये योगाला प्राचीन काळापासून महत्त्व आहे आणि योगामुळे आपण सुदृढ आणि समृद्ध बनू शकतो. दिवसातील दोन तास योगासाठी देऊन आपले जीवन निरोगी बनवा आणि कुटुंबात आनंद व समाधान मिळवा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वामी परमार्थ देवजी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात २१ जून पूर्वी योगा पोहोचायला हवा. निरोगी जीवन खूप महत्त्वाचे आहे आणि ते मिळवण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवावे. यामुळे मुले सुदृढ, आनंदी आणि बुद्धिवान बनतील तसेच भ्रष्टाचार आणि वाईट विचारांपासून दूर राहतील. त्यांनी पतंजली योग समितीच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन योगा शिकवण्याचे आणि निस्वार्थपणे सेवा करण्याचे आवाहन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा योग पतंजली समितीचे जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर यांनी स्वामी परमार्थ देवजी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला बाबली गवंडे, रवींद्र प्रभू देसाई, नारायण राणे, राजेंद्र राणे, नारायण सावंत, चंद्रशेखर नाईक, विशाल लातये, अनिल मस्त्री, रामनाथ सावंत, प्राध्यापक सुभाष गोवेकर, तृप्ती मालवणकर, मृणाली गवंडे, स्नेहल कडवकर, रसिका सावंत आणि सौ. घाडी आदी उपस्थित होते