You are currently viewing सावंतवाडीच्या मोती तलावातील पाणमांजर…..समज गैरसमज…

सावंतवाडीच्या मोती तलावातील पाणमांजर…..समज गैरसमज…

प्राणिमित्रांची संवर्धनाची मागणी…वनविभाग आणि नगरपालिकेला आव्हान तर पर्यटकांसाठी कुतूहल…

♦सावंतवाडीतील मोती तलावात वेगवेगळे मासे आणि पक्षी पहावयास मिळत होते, मध्यंतरी भली मोठी मगरही वास्तव्यास होती. परंतु अलीकडेच शहरवासीयांसाठी कुतूहल वाटण्यासारखे म्हणजे मोती तलावात दिसणारी पाणमांजरे… शहरात तलावात यापूर्वी कधीच हा प्राणी दिसलेला नव्हता, त्यामुळे कित्येकांना त्याबाबत गैरसमज झाला की पाणमांजरांमुळे तलावातील विविध प्रजातींचे मासे संपुष्टात येतील. पक्षी स्थलांतरित होतील. त्यामुळे अनेकांनी पाणमांजरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

♦संवाद मीडियाने पाणमांजरांच्या तलावातील अस्तित्वाबद्दल माहिती प्रसिद्ध केल्यावर कित्येकांनी त्यावर आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नोंदवल्या. महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर बाहेरील राज्यातूनही अनेकांनी पर्यावरण आणि प्राण्यांवर असलेलं आपलं प्रेम, चिंता व्यक्त केली. अनेक प्राणीमित्र पाणमांजर या प्राण्यांविषयी आपल्याकडील माहिती प्रसिद्द करू लागले. ज्यांना सावंतवाडीचे मोती तलाव कसले आहे, कुठे आहे, नैसर्गिक की मानव निर्मित हे माहिती नाही ते सुद्धा व्यक्त होऊ लागले. त्यामुळे प्राणी पक्षी आणि पर्यावरणावर प्रेम करणारे लोकही जागृत असल्याचं दिसून आलं, आणि पाणमांजरांविषयी लोकांमध्ये असलेली भीती, गैरसमज दूर होण्यास मदत झाली.

♦पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे.

♦पाणमांजरांच्या विषयावरून अनेक प्राणीमित्र सावंतवाडीच्या मोती तलावाकडे आकर्षित झाल्याचं दिसून येत आहे. पर्यावरण आणि प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आजही जागृत असल्याने दिसून येत आहे. संवाद मीडियाच्या बातमीमुळे सावंतवाडीचा मोती तलाव पून्हा एकदा प्रकाशझोतात आला आणि पाणमांजरांविषयी लोकांमध्ये असलेले बरेचसे गैरसमज दूर झाले. तसेच मोती तलावात आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या पाणमांजरांचे भविष्यात संवर्धन होईल अशी आशा प्राणिमित्रांमध्ये निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + fourteen =