कुडाळ
कुडाळ भंगसाळ नदीवरील बंधारा आणि रांगणातुळसुलीतील सहा घरकुल प्रश्न या दोन विषयांवरून कुडाळ पंचायत समितीत सभेत शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याला दस्तुरखुद्द सभापतींसह भाजपाच्या सदस्यांनी प्रत्युत्तर दिले. यावरून या सभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे ही सभा चांगलीच वादळी ठरली.
सभागृहात मांडलेले प्रश्न दोन दोन महिने सुटत नसतील तर सभागृहात प्रश्न मांडायचे कशाला? असा सवाल शिवसेनेचे सदस्य राजन जाधव यांनी केला. सभापतींनी सभेचे उपस्थिती बाबत पत्र देऊनही अधिकारी उपस्थित राहत नाहीत अधिकारी एवढे मुजोर झालेत का? असा सवाल करत जाधव यांनी जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत सभा चालवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर काही काळ सभागृहातील वातावरण शांत झाले कामाची पाहणी करते असे सांगत सभापतींनी पुढील विषय घ्यावा असे प्रशासनाला आदेश दिले. त्यावर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यावर भाजपचे चे सदस्य अरविंद परब सभापतींच्या मदतीला धावले.तुम्ही राज्यातील सत्ताधारी पक्षात आहात खासदार आमदार व पालकमंत्री तुमचे आहेत मग त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता तर काम केव्हाच पूर्ण झाले असते असा सल्ला परब यांनी जाधव यांना देताच शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले.
त्याच वेळी शिवसेनेच्या सदस्यांनी प्रत्येक वेळी खासदार आमदार कुठे कुठे लक्ष देणार? हा विषय त्यांचा नसून या सभागृहाचा विषय आहे आम्ही सभाध्यक्ष यांना याबाबत विचारणा केली असे सांगत परब यांना सुनावले.
यावर्षी जाधव व परभणी यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली.
सभापती आईर यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल तसेच पत्र देऊनही अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाईल असे आश्वासन दिले.