You are currently viewing आगामी काळात जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवायचा आहे…

आगामी काळात जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवायचा आहे…

वैभव नाईक; राष्ट्रपती राजवटची गरज नाही, सरकार पाच वर्षे टिकणार…

मालवण

शिवसेनेमुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मला ओळख मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील सर्व सत्ता स्थानांवर भगवा फडकावयाचा आहे. आणि ही घोडदौड अशीच सुरूच ठेवायची आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे केले. दरम्यान विरोधक महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, राष्ट्रपती राजवट लागू करा,अशा मागण्या करत आहेत. प्रत्यक्षात हे सरकार पाच वर्षे स्थिर राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे काम करत आहेत. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य सुविधा उपलब्ध होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जो विश्‍वास दाखविला तो सार्थकी लावण्यात यश मिळाले आहे. तालुका शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील अपंग बांधवांना दुचाकींचे तसेच मत्स्यविक्रेत्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कामगार नेते गुरूनाथ खोत, भाई गोवेकर, संदेश पारकर, आशिष पेडणेकर, सुभाष मयेकर, साईनाथ चव्हाण, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, अतुल मालणकर, मंदार केणी, यतीन खोत, मनीषा जाधव, सुशांत नाईक, बाबा सावंत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, सन्मेश परब, आकांक्षा शिरपुटे, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, शीला गिरकर, सेजल परब, पूजा तळाशिलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास मच्छीविक्रेत्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आमदार नाईक म्हणाले, जेवढे प्रेम मी कुटुंबावर करतो तेवढेच प्रेम जनतेवर करत आहे. जनतेने जो विश्‍वास दाखविला त्या विश्‍वासाच्या बळावरच आज विविध विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळत आहे. आगामी काळातही असेच यश मिळेल. पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा यासाठी कायदा करण्यात आला असून येत्या पावसाळी अधिवेशनात तो कायदा संमत होईल. पारंपरिक मच्छीमारांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. एलईडी मासेमारीच्या विरोधात शासन आहे. मुख्यमंत्री व शिवसेना मच्छीमारांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

मत्स्यविक्रेत्या महिलांनी कोव्हीड काळात चांगले काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. मच्छीविक्रेत्या महिलांनी पुढाकार घेत आपली पतसंस्था सुरू करावी यात भागभांडवलासाठी एक लाख रुपयांची देणगी आमदार नाईक यांनी यावेळी जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा