You are currently viewing प्रवासी संघाचे काम कौतुकास्पद – डॉ. राजश्री साळुंखे

प्रवासी संघाचे काम कौतुकास्पद – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली

प्रवासी संघ जागरुकतेने काम करत असताना समाजातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेते, ही बाब कौतुकास्पद आहे. अशा मानसन्मानमुळे त्या-त्या व्यक्तींचे आत्मबळ वाढते. प्रवासी संघाचे असे उपक्रम इतर संस्थांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रवाशांचे विविध प्रश्न व अडचणी घेऊन हा संघ समाजप्रबोधन करीत असल्याने अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे, असा विश्वास कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी व्यक्त केला.

रथसप्तमी व राष्ट्रीय प्रवासी दिनाचे औचित्य साधून कणकवली तालुका प्रवासी संघाने नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित गुणगौरव सोहळ्यात डॉ. साळुंखे बोलत होत्या. यावेळी डॉ. संदीप साळुंखे, भाई खोत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भालचंद्र मराठे, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, डॉ. विद्याधर ताटशेटे, दादा कुडतकर, अॅड. दीपक अंधारी, मोटर वाहन निरीक्षक जावेद शिकलगार, सचिव सी. आर. चव्हाण, अशोक करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. साळुंखे म्हणाल्या, तंत्रज्ञानामुळे प्रवासही गतिमान झाला आहे. अपघातातून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे काळाची गरज आहे. प्रवासी संघ प्रवाशांच्या हितासाठीच कार्यरत असून या संघाचे सभासद व्हावे. प्रत्येक माणूस प्रवासी असून प्रत्येकाला अनेक ठिकाणी अचडणींशी सामना करावा लागतो. त्यासाठी या संघाचे कार्यातून प्रबोधन असून या उपक्रमशील संघात सहभागी व्हावे.

जीवनगौरव प्राप्त भाई खोत यांनी या प्रवासी संघाचे कौतुक केले. गेल्या काही वर्षांत या संघाने चळवळ मानून एसटी, रेल्वे अन्य वाहनांतून प्रवाशांना न्याय देण्याचे काम केले. अनेक समस्यांकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून या प्रवासात सोयीसुविधा कशाप्रकारे मिळतील यासाठी मनोहर पालयेकर व त्यांच्या संघाने काम केले आहे. समाजात अशी जागरूकता होणे काळाची गरज असून या प्रवाहात सृजनशील प्रवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जावेद शिकलगार यांनी वाढते अपघात व घ्यावयाची काळजी याबाबत तर अॅड. दीपक अंधारी यांनी अपघातानंतर विम्याचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. संदीप साळुंखे, बंडू हर्णे, भालचंद्र मराठे, अशोक करंबेळकर, दादा कुडतरकर यांनी भाषणे झाली. पुरस्कारप्राप्त स्नेहलता राणे यांनी मनोगत व्यक्त केले.

गुणगौरव सोहळ्यात कणकवली कॉलेजचे माजी चेअरमन भाई खोत यांना जीवनगौरव, कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. नीलेश कोदे, कातकरी समाजासाठी काम करणारे उदय आईर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, अक्षरसंग्राहक निकेत पावसकर, आदर्श शिक्षिका स्नेहल राणे, विना अपघात सेवा देणारे अजित राणे, रिक्षाचालक संतोष सावंत, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, साहित्यिक अरुण इंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मनोहर पालयेकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. श्रद्धा कदम, सौ. पूजा सावंत यांनी केले. स्वागत व आभार प्रदर्शन रमेश जोगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखाराम सपकाळ, शुभलता पालयेकर, अमित मयेकर, महानंदा चव्हाण, प्रवीण आरोलकर, राजन ठाकुर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा