तहसील कार्यालयासमोर उपोषण; केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…
सावंतवाडी
केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आज येथील काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या ३ काळ्या कायद्यांचा व वाढती महागाई-बेरोजगारी यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण छेडले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, महेंद्र सांगेलकर, राजू मसुरकर, राजेंद्र म्हापसेकर, राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ गावडे, स्मिता वागळे, अमिंदी मेस्त्री, विभावरी सुकी, जास्मिन लक्ष्मेश्वर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री.गावडे म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेले तीन काळे कायदे त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. त्यामुळे या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र याकडे केंद्र सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.असा आरोप त्यांनी केला. तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे आम्ही समर्थन करत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कॉम्प्रेस म्हणून पाठीशी राहु, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.