*अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक व जागतिक साकव्य विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुठे कुणाला कळते बाई*
*वृत्त: वनहरिणी*
मात्रा: ३२ (८+८+८+८)
आई पत्नी बहीण मुलगी कितीक नाती जगते बाई
घर सोडूनी माय पित्याचे सून म्हणूनी रुजते बाई
भले पाहुनी पुत्राचे ती धन संपत्ती इच्छा धरते
स्वार्थ स्वतःचा नसतानाही कुणी कैकयी ठरते बाई
साखर झोपी असता घरटे न्हाणीघरात ती वावरते
जबाबदारी कर्तृत्वाचे उदाहरण मग बनते बाई
संसाराच्या सुखदुःखांनी आधार खरा तिचा वाटतो
दुःख लपवुनी हास्यामागे घरट्यासाठी झुरते बाई
घर सांभाळा, खर्च भागवा नि धुणी भांडी उष्टी काढा
खस्ते खाउन रात्रंदिवसा, कुठे स्वतःला उरते बाई
आई म्हणजे कणा घराचा, विश्वासाची वीणच पत्नी
उत्साहाचे प्रतीक असुनी कुठे कुणाला कळते बाई
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६
