३८ गावांतून मार्ग; १२३ किलोमीटर अंतर कमी होणार प्रवासाचे पाच ते सहा तास वाचणार; भूसंपादनामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक
विटे / प्रदीप जोशी :
पुणे-बंगळूर आठपदरी ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या हालचालींना आता वेग आला असून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांतील तब्बल ३८ गावांतून हा महामार्ग जाणार आहे. त्यापैकी तासगाव तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. नवीन वर्षात महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या महामार्गामुळे दळणवळण, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्या, तरी तासगाव पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांसह शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनामुळे धाकधूक वाढली आहे. किती जमीन जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विकासाची नवी वाट आणि बागायतदारां समोरील संभाव्य अडचणी, अशी दुहेरी चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे.
सध्याच्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गा वरील वाढती वाहतूक, वाहनांची कोंडी आणि प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन या पर्यायी महामार्गाची उभारणी करण्यात येत आहे. सुमारे ७०० किलोमीटर लांबीचा हा आठपदरी महामार्ग पुणे ते बंगळूरदरम्यानचे अंतर सुमारे १२३ किलोमीटरने कमी करणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत पाच ते सहा तासांची बचत होण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. भूसंपादन, जमिनीचे मूल्यांकन, मोबदला निश्चिती आणि जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
तासगाव तालुक्यातील १४ गावांतून महामार्ग असल्याने या महामार्गाचा तासगाव तालुक्यातील मोठा पट्टा प्रभावित होणार आहे. कचरेवाडी, नरसेवाडी, किदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, गौरगाव, हातनाळी, बरतवडे, सावळज, वज्रचौंडे, मनेराजुरी आणि गव्हाण या गावांच्या हद्दीतून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे तासगाव पूर्व भागाच्या दळणवळण आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
चार तालुक्यांतील ३८ गावांना जोडणार
खानापूर तालुक्यातील माहुली येथून या मार्गाची सुरुवात होऊन वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेनावी, रेणावाग, घोटी खुर्द आणि घोटी बुद्रुक या गावांतून तो पुढे जाणार आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकरोळी, रामपूरवाडी आणि कोंगनोळी या गावांतून पुढे मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडीमार्गे हा महामार्ग कर्नाटकात प्रवेश करेल.
भूसंपादनाच्या हालचालींना वेग
महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मार्गात येणारे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब, वीजवाहिन्या, पाणीपुरवठा योजनांच्या जलशुद्धीकरण केंद्रांसह मुख्य जलवाहिन्यांची मोजणी करण्यात आली आहे. वन विभागाच्या क्षेत्राचेही सर्वेक्षण झाले आहे. काही ठिकाणी महामार्गाच्या हद्दीची निश्चिती करण्यासाठी खांब रोवण्यात आले आहेत.
विमान उतरविण्याचीही सुविधा देखील आहे. या महामार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरविण्याची सुविधा. पुणे आणि बंगळूरजवळ प्रत्येकी पाच किलोमीटर लांबीच्या धावपट्ट्या प्रस्तावित आहेत. याशिवाय वाहनचालकांसाठी प्रसाधनगृहे, टोलनाके आणि लगतच्या गावांना जोडणारे संपर्क रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.
उद्योग-व्यवसायाला नवी संधी मिळणार आहे. महामार्ग परिसरात लॉजिस्टिक हब आणि औद्योगिक क्लस्टर्स उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होण्याबरोबरच शेतीमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचविणे शक्य होणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही अपेक्षा आहे.
द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण
तासगाव पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांची उपजीविका द्राक्षबागांवर अवलंबून आहे. प्रस्तावित महामार्गामुळे काही शेतजमिनी आणि द्राक्षबागा बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार असली, तरी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि शेतजमिनीचे योग्य मूल्यांकन मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः द्राक्षबागांचे मूल्यांकन करताना उभ्या पिकांचा, बागांच्या उभारणीसाठी केलेल्या गुंतवणुकीचा आणि भविष्यातील उत्पादनाचा विचार करावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
एकंदरीत, पुणे-बंगळूर आठपदरी महामार्ग तासगावसह सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र विकासाच्या या महामार्गावरून जाताना शेतकऱ्यांच्या जमिनी, द्राक्षबागा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दुर्लक्षित होऊ नये, हीच स्थानिक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
