You are currently viewing मालवण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची १६ रिक्त पदे भरणार

मालवण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची १६ रिक्त पदे भरणार

मालवण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची १६ रिक्त पदे भरणार

३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सिंधुदुर्ग

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प मालवण अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसांची एकूण १६ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांची ५ आणि मदतनीसांची ११ पदे समाविष्ट आहेत.

असगणी तांबेवाडी, शिरवंडे लाडवाडी, तोंडवळी तळाशील, तोंडवळी वरची व पेंडुर-खरारे येथे अंगणवाडी सेविकांची पदे, तर हडी कोथेवाडा, हडी पाणखोलजुवा, आमडोस गावठण, आमडोस व्हाळवाडी, कुंभारमाठ, देवबाग मधला, कट्टा बाजार नं 2, कुणकवळे टेंब, आचरा हिर्लेवाडी, त्रिंबक साठमवाडी व बुधवळे येथे मदतनीसांची पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. उमेदवार संबंधित महसुली गावातील कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच लहान कुटुंबाची अट लागू राहील.

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह बंद लखोट्यातून बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मालवण यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, कायम रहिवासी दाखला, शैक्षणिक गुणपत्रके, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), विवाह नोंदणी दाखला (लागू असल्यास), लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र तसेच अनुभव, विधवा किंवा अनाथ असल्याबाबतची प्रमाणपत्रे (लागू असल्यास) जोडणे आवश्यक आहे.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, सार्वजनिक सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे व इतर अटींबाबतची सविस्तर माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र महिला उमेदवारांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प मालवण येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा