स्पृहाच्या शिवचरित्रावरील भाषणाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावल्या!
दोडामार्ग केंद्रशाळेला डॉ. अपूर्वा बासूर यांची भेट; विद्यार्थिनीच्या वक्तृत्वकलेचे केले कौतुक, शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन
दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी आज दोडामार्ग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा दोडामार्ग नंबर १ ला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध कलागुणांची माहिती जाणून घेतली.
या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थिनी कु. स्पृहा दळवी हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण सादर केले. शिवरायांचा इतिहास, त्यांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि प्रेरणादायी विचार ओघवत्या वाणीमध्ये मांडत स्पृहाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पृहाचे भाषण ऐकून डॉ. अपूर्वा बासूर यांनी तिचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि ऐतिहासिक विषयांची जाण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी शाळेच्या भौतिक गरजांचीही माहिती घेतली. शाळेच्या आवश्यक भौतिक गरजांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता यावे, यासाठी त्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासूर यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्पृहा दळवी हिच्या भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक होत आहे.
