You are currently viewing नागरी संरक्षण दलातर्फे ओरोस येथे मॉक ड्रिल व ब्लॅकआऊट कवायतीचे आयोजन

नागरी संरक्षण दलातर्फे ओरोस येथे मॉक ड्रिल व ब्लॅकआऊट कवायतीचे आयोजन

नागरी संरक्षण दलातर्फे ओरोस येथे मॉक ड्रिल व ब्लॅकआऊट कवायतीचे आयोजन

सिंधुदुर्ग

केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच उपसंचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशाने आणि ले. कर्नल प्रशांत चतुर, उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरी संरक्षण मॉक ड्रिल व ब्लॅकआऊट कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मिळालेल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समाजाची सज्जता आणि त्वरित प्रतिसाद क्षमता वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच अनुषंगाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्ह्यांमध्ये सन २०२६ मध्ये वर्षातून दोन वेळा नागरी संरक्षण मॉक ड्रिल (Civil Defence Exercise) आणि ब्लॅकआऊट आयोजित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), ओरोस येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. ले. कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनियंत्रक मिलिंद जाधव यांनी या कवायतीचे संचालन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रतिभा वराळे यांनी भूषविले. यावेळी नायब तहसीलदार (सामान्य प्रशासन) संतोष मराठे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदी उपस्थित होते.

युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सीमांवर लष्कर, नौदल आणि हवाई दल कार्यरत असताना नागरी वस्त्यांमधील नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी नागरी संरक्षण दल पार पाडते. शत्रूच्या हवाई हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत नागरी संरक्षण दलाच्या क्षेत्ररक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. तसेच अग्निशमन, विमोचन कार्य, वैद्यकीय सेवा, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांसारख्या आपत्कालीन सेवा यंत्रणांशी समन्वय साधून जिल्हा प्रशासनाला मदत केली जाते.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता, बचावकार्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वय प्रभावीपणे साधता यावा, या उद्देशाने या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. अशा कवायतींमुळे नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण होण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता वाढण्यास मदत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा