You are currently viewing ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ विशेष अभियान

‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ विशेष अभियान

‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ विशेष अभियान

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार

सिंधुदुर्ग

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ (Swachh Shauchalay – Garimamaya Bhavishya) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची कार्यक्षमता, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुलभता सुधारणे हा आहे.यंदाच्या जागतिक शौचालय दिनाची संकल्पना ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ (Safe Toilets, Equal Futures) अशी आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या पाहणीमध्ये शौचालयांतील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक साहित्य, मलमूत्र व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेची तपासणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी व सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.

गावातील वैयक्तिक घरगुती शौचालयांची स्थिती तपासून आवश्यकतेनुसार दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. एक खड्डा शौचालयाचे दोन खड्ड्यांच्या शौचालयामध्ये रूपांतर तसेच आवश्यकतेनुसार सेप्टिक टँक व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. मल गाळ व्यवस्थापन (Faecal Sludge Management – FSM) नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि यांत्रिक पद्धतीने मल गाळ उपसण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत शाळा व अंगणवाडी केंद्रांमधील शौचालयांची तपासणी करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता व साबणाने हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. शाळा स्वच्छता परीक्षण (School Sanitation Audit) आयोजित करून विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यात येणार आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शौचालयांचा सहज वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी व पंचायत समित्यांना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक, सामुदायिक तसेच वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी उत्कृष्ट शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने उत्कृष्ट सार्वजनिक व संस्थात्मक शौचालयांची तसेच उत्कृष्ट वैयक्तिक घरगुती शौचालयांची निवड करावयाची आहे. पंचायत समिती स्तरावर उत्कृष्ट शौचालयांची निवड करून जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. अभियानाच्या सांगता कार्यक्रमावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शौचालयांचा व संबंधित ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी, प्रतिष्ठेशी आणि सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, नियमित देखभाल व सुरक्षित वापर सुनिश्चित करावा. नागरिकांनीही स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा