मुंबई : सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा नवी मुंबईशी हवाई मार्गाने जोडणारी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत मिळालेल्या सहकार्याबद्दल यावेळी दीपक कपूर यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाल्याने सिंधुदुर्गच्या हवाई वाहतुकीला नवसंजीवनी मिळाली आहे. या विमानसेवेमुळे जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक तसेच व्यावसायिकांना मुंबई महानगर प्रदेशाशी थेट हवाई संपर्काची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी, जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.
