परिवारातील डॉ. शोभाताई पोटोडे यांचा स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ म्हणून जसा नावलौकिक आहे तसाच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वैद्यकीय व्यवसायी म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. वैद्यकीय व्यवसाय व सामाजिक बांधिलकी ही दोन्हीही समीकरणे सांभाळणे तशी कठीण गोष्ट. पण ती डॉक्टर शोभाताई पोटोडे यांना साधली आहे आणि त्यामुळे अमरावतीच्या धन्वंतरी क्षेत्राबरोबर साहित्यिक व सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
आमच्या मित्र परिवारातील डॉ. बबन बेलसरे यांच्या माध्यमातून डॉ. शोभाताई यांचा माझा ऋणानुबंध जुळून आला . त्यांची माझी विचारसरणी जुळल्यामुळे आजही तो ऋणानुबंध कायम आहे आणि कायम राहणार आहे.
आम्ही अमरावतीला अंबा पेठेच्या मनीबाई गुजराती हायस्कूलच्या मैदानावर प्राध्यापक शाम मानव यांची सात दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती. ही गोष्ट 1994 यावर्षीची. सात दिवसाची ही व्याख्यानमाला संपूर्ण विदर्भात गाजली .कारण सुमारे दहा हजार लोकांची प्रचंड उपस्थिती या व्याख्यानाला होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राध्यापक श्याम मानव यांनी सलग सात दिवस दररोज तीन तास याप्रमाणे व्याख्याने दिली आणि ती प्रचंड गाजली. पुढे या व्याख्यानाच्या ध्वनिफिती निघाल्या व त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित झाल्यात.
मैदानावर व्याख्यानमालेचे आयोजन करणे म्हणजे फारच मोठे काम. मैदान प्रचंड मोठे. , स्टेज उभारणे. लोकांच्या बसण्याची व्यवस्था करणे. लाइटिंगची व्यवस्था करणे हे थोडे अवघडच काम होते. आजच्यासारख्या सुविधा 32 वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हत्या. पण सर्व स्तरातून मदतीचे हात आले आणि एक अमरावतीच्या इतिहासात सात दिवसाच्या अविस्मरणीय व्याख्यानमालेची नोंद झाली.
ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी डॉ. शोभाताई पोटोडे व त्यांचे यजमान जय भारत पोटोडे व बंधू श्री जुनघरे यांनी मनापासून तन-मन-धनाने मदत केली. डॉ. बबन बेलसरे जाधव उद्योग समूह हे तर मदतीला होतेच पण शोभा पोटोडे यांनी आपला हात सढळ केला व व्याख्यानमालेला मूर्त स्वरूप देण्यास आपला सिंहाचा वाटा उचलला.
साहित्य संगम असो की बहुजन साहित्य परिषद असो डॉ पंजाबराव देशमुख अकादमी असो की मिशन आयएएस असो की डॉ.शोभा गायकवाड यांचे हितगुज असो किंवा प्राचार्य डॉक्टर शोभा रोकडे यांचा कार्यक्रम असो शोभाताई आवर्जून आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढतात आणि कार्यक्रमाला हजेरी लावतात. वेळ मिळाला तर तसे लेखनही करतात आणि कवीसंमेलनात भागही घेतात. अमरावतीला आज संपन्न होत असलेल्या शब्दवेल साहित्य संमेलनामध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
श्री भैय्यासाहेब वाटाणे हे अमरावतीचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व. प्रशासनामध्ये उच्चपदस्थ सचिव म्हणून राहिलेला हा माणूस मुळचा अमरावतीचा .
ते जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा आम्ही त्यांचा भव्य असा अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात सत्कार घडवून आणला अर्थातच त्यासाठी डॉ. शोभाताई पोटोडे आमच्या पाठीशी उभे राहिल्यात हे वेगळे सांगणे न लगे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. दादासाहेब काळमेघ यांचा आम्ही नागरिक सत्कार आयोजित केला होता. दादा साहेबांच्या पाठीशी बहुमत नव्हते पण श्री शिवाजी शिक्षण संस्थेची घटना ही अध्यक्षीय प्रणालीनुसार चालते. दादासाहेबांचे व्यक्तिमत्व अफाट. आम्ही त्यांचा नागरिक सत्कार करण्याचे ठरविले. दादासाहेब तेव्हा चर्चेत होते. टीका टिपण्या होत होत्या. पण या काळात या सत्कार समारंभाला ज्यांनी खऱ्या अर्थाने हातभार लावला त्यामध्ये शोभाताई पोटोडे आणि त्यांचे यजमान जय भारत पोटोडेयांचा मोठा वाटा आहे. प्रसिद्ध दलित साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला श्री दादासाहेब काळमेघ यांचा सत्कार तत्कालीन लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिला व लक्षात आहे पण.
श्री भैय्यासाहेब वाटणे यांच्या निधनानंतर शोभाताईंनी आपल्या ताईला म्हणजे भगवती ताई वाटाणे यांना लि हिण्यासाठी प्रोत्साहन दिले. भैय्यासाहेब नाही पण त्यांच्या आठवणी आहेत त्या तू शब्दबद्ध कर असा प्रामाणिक सल्ला त्यांना दिला व ताईंकडून दोन ग्रंथ लिहून घेतले व त्याचा देखणा प्रकाशन समारंभ अमरावतीमध्ये रंगोली पर्लच्या सभागृहात घडवूनही आणला.
आज 14 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त रुग्णसेवेबरोबरच साहित्य सेवेला व समाजसेवेला राहिलेल्या या धन्वंतरीला हार्दिक शुभेच्छा.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
