You are currently viewing परशुराम उपरकर यांची मत्स्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा…

परशुराम उपरकर यांची मत्स्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा…

उपोषण स्थळी दिली भेट; मत्स्य अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराबाबत लेखी देण्याचे केले आवाहन

मालवण

एलईडी पर्ससीन मासेमारीच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात छेडलेल्या साखळी उपोषण स्थळी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट देत आंदोलनाला मनसेचा पाठिंबा दर्शविला. यावेळी उपरकर यांनी मच्छीमार तसेच मत्स्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्य शासनाच्या मत्स्य विभागाने नोंदणी केलेल्या पर्ससीन नौकाना राज्याचे नियम मोडून बंदी कालावधीतही केंद्राच्या हद्दीत मासेमारी करत असतील तर अशा नौकाना राज्याचा कायदा लागू नाही तसेच राज्याने नोंदणी केलेल्या नौकांवर राज्य मत्स्य विभाग कारवाई करू शकत नाही हे मत्स्य अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडून लेखी स्वरूपात सादर करावे असे मत्स्य अधिकाऱ्यांना सांगत अनधिकृतपणे सुरू असलेल्या पर्ससीन एलईडी मासेमारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर पारंपारिक मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरू असून त्यास मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट देऊन मच्छीमारांचे मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी उपस्थित असलेल्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल तसेच जिल्हाध्यक्ष व उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, अमित इब्रापुरकर आदींसह इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित झालेले प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. मालवणकर व परवाना अधिकारी श्री. भालेकर यांच्याशी उपरकर यांनी चर्चा केली. केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत कोणत्याही नौका मच्छीमारी करू शकत असल्या तरी राज्य मत्स्य विभागाने परवाना दिलेल्या पर्ससीन नौका बंदी कालावधी झुगारून व राज्याचे मासेमारी नियम तोडून केंद्राच्या हद्दीत जाऊन मच्छीमारी करत असतील तर त्यांच्यावर राज्य मत्स्य विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. आणि ही कारवाई होत नसेल तर राज्यानेच परवाना दिलेल्या पर्ससीन नौकांना राज्याचे नियम लागू नाहीत हे मच्छीमारांना लेखी स्वरूपात द्या. स्थानिक अधिकाऱ्यांना ते जमत नसेल तर कारवाई बाबत मच्छीमारांनी केलेल्या मागण्या मत्स्य आयुक्त व सचिवांकडे पोहचवून वरिष्ठांकडूनच लेखी पत्र मच्छीमारांना द्या म्हणजे मच्छीमार केंद्र शासनाकडे दाद मागून पुढील लढा लढू शकतील असे यावेळी परशुराम उपरकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा