माजी प्रशासकीय अधिकारी प्रकाश राणे
मुंबई : दीपावली हा आनंदाचा उत्साहाचा, मांगल्याचा दीपोत्सव सर्वत्र साजरा होत असताना दीपावली अंकाच्या रूपाने मोठा वाचकवर्ग निर्माण झाला असून प्रतिथयश लेखकासोबत नवदित लेखकांना संधी उपलब्ध होऊ शकली असे मुंबई महापालिका माजी प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्री. प्रकाश राणे यांनी मुलुंड (पूर्व) भंडारी सभागृहात ८४ व्या दर्यावर्दी दीपावली अंकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित वाचकप्रेमीना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी कार्यकारी संपादक पांडुरंग भाबल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर लेखिका भाग्यश्री नूलकर यांनी प्रास्ताविक करताना दर्यावर्दीची वाटचाल यावर मार्मिक शब्दात विवेचन केले. माजी प्रशासकीय अधिकारी राणे पुढे म्हणाले की, दर्यावर्दी संपादक अमोल सरतांडेल यांनी दीपावली अंकाची परंपरा संस्कृती टिकून ठेवताना विविध विषयांवर लिखाणाचा यामध्ये समावेश केल्याचं पाहायला मिळते. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे नमूद केले. यावेळी सानेगुरुजी कथामालेचे देवकीनंदन मुक्काम, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, लेखिका सुप्रिया मोरे, अँड मोहन सरतांडेल, रामचंद्र वैराळ, अनिल बोडस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उल्हास कुलकर्णी, भगवान आडगावकर, सौ. अनघा सरतांडेल,सौ. समृद्धी रेवडकर आदींनी मनोगत व्यक्त केले. संपादक अमोल सरतांडेल यांनी दर्यावर्दीच्या प्रवासात बऱ्याच लोकांनी सहकार्य केले आणि आजही या सहकार्यामुळे अंकाची वाटचाल अविरत सुरू आहे हा स्नेहसंबंध असाच राहू द्या! असे सूचित केले. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक पांडुरंग भाबल यांनी अतिशय मौलिक शब्दात केले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन अँड मोहन सर सरतांडेल यांनी केले.
