You are currently viewing माणसे जोडणारा एक आनंदयात्री – राजाराम नथुराम तारे

माणसे जोडणारा एक आनंदयात्री – राजाराम नथुराम तारे

काही माणसे नात्याने आपल्या आयुष्यात येतात; पण आपल्या स्वभावाने आणि वागण्याने मनात कायमचे स्थान निर्माण करतात. त्यांच्याशी रक्ताचे नाते नसते, तरी आपलेपणाचे बंध इतके घट्ट जुळतात की ती घरातील माणसांपेक्षाही अधिक जवळची वाटू लागतात. राजाराम नथुराम तारे ऊर्फ आमचे लाडके भाऊ हे असेच एक व्यक्तिमत्त्व!

१९९९ साली माझी मोठी बहीण ज्योत्स्ना बावन्न चाळीतून बावन्न बंगला, पनवेल येथील तारे कुटुंबात लग्न होऊन गेली. नात्याने आम्ही त्यांचे सोयरे झालो. सुरुवातीला भाऊंकडे सोयरे म्हणून पाहिले; पण काही काळातच हे नाते सोयरीकीच्या पलीकडे गेले. भाऊ घरातील वडीलधाऱ्या माणसांसारखे, मोठ्या काकांसारखे वाटू लागले. पुढे नातवंडे आली आणि भाऊ केवळ ज्योत्स्नाचे सासरे राहिले नाहीत, तर सगळ्यांचेच लाडके भाऊआजोबा झाले. नात्यांचा हा प्रवास कागदोपत्री घडत नसतो, तो मनाच्या अंगणात घडत असतो, याची जाणीव भाऊंनी आम्हाला करून दिली.

त्यांच्या नावातच एक वेगळे वैशिष्ट्य होते. मी त्यांना मुद्दाम ‘सदानंद तारे’ म्हणून चिडवत असे. पण स्वतःच्या नावाबाबत ते शेवटपर्यंत ठाम होते. लगेच म्हणायचे, ‘मी राजाराम नथुराम तारे आहे!’ त्यांच्या या उत्तरात एक वेगळाच स्वाभिमान होता. खरंच, ते नावाप्रमाणे राजासारखे जगले आणि रामासारखे एकपत्नीव्रत जपत राहिले. पत्नीच्या निधनानंतर जवळपास चाळीस-एकेचाळीस वर्षे त्यांनी आई आणि बाबा या दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडल्या आणि संसाराचा गाडा सांभाळला. जेवणातील पहिला घास ते कावळ्यासाठी काढून ठेवायचे. ‘भाऊ, कोणासाठी ठेवता?’ असे आम्ही विचारायचो. त्यावर ते फक्त हसायचे. त्या हसण्यात पत्नीच्या आठवणी आणि तिच्याविषयीचे प्रेम दडलेले असायचे. कुटुंबासाठी जगणे, नाती जपणे आणि आपल्या माणसांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणे, हेच त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते.

भाऊंचा स्वभाव अतिशय गोड, लाघवी आणि शांत होता. कोणाविषयी वाईट विचार नाहीत, कोणाबद्दल मनात आकस नाही, आपल्या नशिबाला दोष देण्याची वृत्ती नाही. आयुष्यात कितीही चढ-उतार आले, तरी त्यांचा चेहरा आणि मन प्रसन्न राहिले. स्वतःच्या वाट्याला आलेले आयुष्य त्यांनी कुरकुरत नव्हे, तर स्वीकाराने आणि आनंदाने जगले. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने एक ‘आनंदयात्री’ होते. आयुष्याकडे तक्रारीच्या नजरेने न पाहता, जे मिळाले त्यात समाधान शोधणारी माणसे आज दुर्मीळ झाली आहेत.

भाऊंना वाचनाची विलक्षण आवड होती. पुस्तकांशी त्यांचे एक वेगळेच नाते होते. भविष्यविषयक पुस्तकांचा संग्रह करण्याचा त्यांना विशेष छंद होता. अनेकांच्या पत्रिका त्यांनी जपून ठेवल्या होत्या. ग्रह-ताऱ्यांच्या गणितातून माणसांच्या आयुष्याचा वेध घेण्याची त्यांना विशेष आवड होती. कदाचित म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केले जाणार आहे, ही गोष्ट मनाला विशेष भावते. आयुष्यभर पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसाच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वरीसारख्या ज्ञानग्रंथाचे वाटप होणे, यापेक्षा अर्थपूर्ण श्रद्धांजली कोणती असू शकते? भविष्याचा वेध घेणाऱ्या भाऊंच्या स्मृतींना ज्ञानेश्वरीतील जीवनविचारांची जोड मिळत आहे.

माझ्याइतका त्यांना त्रास देणारा कदाचित कोणीच नसेल! पण हा त्रास म्हणजे आमच्या गप्पांचा, चेष्टामस्करीचा आणि मनमोकळ्या संवादाचा अविभाज्य भाग होता. आमच्या गप्पांना विषयांची मर्यादा नसायची. कधी राजकारण, कधी समाजकारण, कधी जुन्या आठवणी, तर कधी संगीत! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे ते वर्गमित्र होते. त्यामुळे त्यांच्याविषयीचे किस्से सांगताना भाऊ अगदी रंगून जायचे. मनोहर जोशी यांचे बालपण किती खडतर गेले आणि पनवेलला आल्यानंतर त्यांची भेट कशी झाली, याचे किस्से ते सांगायचे. एमएससीबीमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या आठवणीही आमच्या गप्पांमध्ये रंग भरायच्या. जुन्या आठवणींच्या या प्रवासात वेळ कसा निघून जायचा, हे समजतही नसे.

गप्पांचा ओघ कधी संगीताकडे वळायचा, हेही समजायचे नाही. गीतरामायणातील गाणी असोत किंवा ‘सागरा प्राण तळमळला’ हे भावस्पर्शी गीत असो, आम्ही त्यात रमून जायचो. पण भाऊंचे अत्यंत आवडते गाणे होते, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!’ या गीतातील जीवनाचे तत्त्वज्ञान कदाचित त्यांच्या जगण्याशीही जोडलेले होते. माणसाच्या हातात सगळेच नसते; काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, हे त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तक्रार न करता परिस्थितीचा स्वीकार करणाऱ्या भाऊंच्या जीवनदृष्टीचे ते प्रतिबिंब होते.

त्यांच्या भविष्यविषयक आवडीची एक आठवण आजही मनात घर करून आहे. नातू तनिष लहान असताना, नेमके वर्ष आठवत नाही; पण भाऊंचे मित्र त्यांची पत्रिका पाहून म्हणाले होते, ‘भाऊ, हे वर्ष काढलेस तर नक्की नव्वदीच्या पुढे जाशील.’ त्या वेळी मी त्यांना धीर देत म्हणाले होते, ‘हेही वर्ष जाईल भाऊ, काही चिंता करू नका.’ भाऊंच्या मित्राने केलेली ती भविष्यवाणी आज आठवली की मन भरून येते. त्या वेळी भाऊंना दिलेला धीर आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहतात. आयुष्य किती अनिश्चित आहे, याचीही जाणीव होते.

भाऊंच्या स्वभावातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे नात्यांप्रती असलेले त्यांचे निरपेक्ष प्रेम. सोयरे अण्णांसोबत असलेली त्यांची मैत्री आणि माझ्या बाबांसोबत असलेला त्यांचा स्नेह नेहमीच जाणवायचा. मुले, सुना आणि जावई चांगले आहेत, तरीही मी त्यांना चिडवायचे, ‘भाऊ, तेवढी मुले आणि सुना चांगल्या मिळायला हव्या होत्या तुम्हाला!’ त्यावर ते अगदी सहजपणे म्हणायचे, ‘पोरी, सगळी आपली माणसे आहेत.’ किती साधे वाक्य! पण त्यामागे किती मोठे मन दडलेले होते! कोणाविषयी राग नाही, कोणाची मागून निंदा नाही, दोष काढण्याची सवय नाही. प्रत्येकाला आपले मानण्याची ही वृत्तीच त्यांच्या मोठेपणाची खरी ओळख होती.

‘बाळा, जे द्याल ते मी आनंदाने खाईन,’ हे त्यांचे आणखी एक आवडते वाक्य. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा स्वभाव अगदी साधा आणि समाधानी होता. पण नातवंडांसोबत असताना मात्र आजोबांचा उत्साह काही औरच असायचा. हॉटेलमध्ये नातवंडांसोबत चिकनचा आवडीने आस्वाद घेणारे भाऊ त्यांच्यासाठी अगदी खास होते. नातवंडांना केवळ प्रेम देणारे नव्हे, तर त्यांच्यासोबत बालपण पुन्हा जगणारे आजोबा होते ते! त्यांच्या सहवासात वयातील अंतर जाणवत नसे आणि आजोबा व नातवंडांमधील मैत्रीचे नाते अधिक घट्ट व्हायचे.

आज भाऊ आपल्यात नाहीत, हे मनाला मान्य करणे कठीण आहे. पण त्यांचा सहवास संपला, तरी त्यांच्या आठवणींचे वास्तव्य आपल्या मनातून कधीच संपणार नाही. त्यांच्या शांत स्वभावात, सहज बोललेल्या शब्दांत, जुन्या गाण्यांच्या सुरांत, पुस्तकांच्या पानांत आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या आठवणीत ते कायम राहतील. त्यांच्या गप्पा, त्यांची चेष्टा, त्यांचे ‘सगळी आपली माणसे आहेत’ हे वाक्य आणि त्यांचा आनंदी चेहरा यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.

आज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करताना असे वाटते की, भाऊंच्या आयुष्याचा खरा संदेशही हाच होता. माणसाने किती मोठे पद मिळवले, किती संपत्ती कमावली किंवा किती प्रसिद्धी मिळवली, यापेक्षा त्याने किती माणसे जोडली आणि किती जिव्हाळ्याची नाती निर्माण केली, हे अधिक महत्त्वाचे असते. भाऊंनी आयुष्यभर माणसे जोडण्याची आणि नाती जपण्याची हीच संपत्ती कमावली. त्यांनी मोठमोठे उपदेश केले नाहीत; पण स्वतःच्या वागण्यातून माणुसकीचा अर्थ शिकवला. कोणाकडून अपेक्षा न ठेवता त्यांनी प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव दिली. आयुष्याकडे तक्रारीने न पाहता प्रत्येक क्षणात आनंद शोधला.

राजाराम नथुराम तारे — नावात राजा, जगण्यात राम आणि मनात माणुसकीचा अथांग सागर!

काही माणसांच्या जाण्याने घर रिकामे होते, काहींच्या जाण्याने मन पोरके होते; पण भाऊंसारख्या माणसांच्या जाण्याने नात्यांच्या एका सुंदर पर्वाचा शेवट झाल्यासारखे वाटते. त्यांनी जपलेल्या नात्यांची ऊब आणि त्यांच्या आठवणी आमच्या मनात सदैव जिवंत राहतील.

 

लेखिका – डॉ. रश्मी शेटये तुपे

प्रतिक्रिया व्यक्त करा