मंदी आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारकांचा दिलासादायक निर्णय; ११०० कामगारांना लाभ
विटा / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
वस्त्रोद्योगातील मंदी, वाढते उत्पादन खर्च आणि सातत्याने होणारे आर्थिक नुकसान अशा प्रतिकूल परिस्थितीतही विटा शहरातील यंत्रमाग कामगारांना यंदाही १२ टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी घेतला आहे. विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाच्या सभागृहात झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे शहर, औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सुमारे ११०० कामगारांना एकूण सव्वा कोटी रुपयांचा बोनस वितरित होणार आहे.
यंत्रमागधारकांच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कामगारांच्या दिवाळीत गोडवा निर्माण होणार आहे. यंत्रमाग कामगार, वाफणीवाले, जॉबर्स, घडीवाले आणि कांडीवाले अशा विविध घटकांतील कामगारांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योगाला मंदीचा मोठा फटका बसत आहे. कापूस आणि सुताच्या दरातील अस्थिरता, साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वाढलेले वीजदर तसेच परदेशातून करचुकवेगिरी करून होणारी कापड आयात यामुळे उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटी, प्रादेशिक तसेच सहकारी व खासगी उद्योगांमधील शासकीय भेदभाव आणि केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमुळेही वस्त्रोद्योग अडचणीत आल्याची भावना यंत्रमागधारकांनी व्यक्त केली.
सततच्या नुकसानीमुळे विटा शहरातील शेकडो यंत्रमाग भंगारात विकण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांना दिवाळी साजरी करता यावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यंदाही गतवर्षाप्रमाणे १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, बाबुराव म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शशिकांत तारळेकर, मिलिंद चोथे, अशोक रोकडे, राजू चौगुले, विनोद तावरे, नितीन तारळेकर, गोपाळ तारळेकर, प्रकाश मराठे, महादेव कुरकुटे, डी. के. चोथे, राजधन चोथे, सचिन रसाळ यांच्यासह शहरातील अनेक यंत्रमागधारक उपस्थित होते.
