वसुबारसनिमित्त घारपी शाळेत गोमातेचे पूजन
*विद्यार्थ्यांनी जपली संस्कारांची परंपरा; गोमातेप्रती व्यक्त केली कृतज्ञता*
*बांदा*
दिवाळीच्या प्रारंभी साजरा होणारा वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीचा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी गोमातेचे मनोभावे पूजन करून भारतीय संस्कृतीतील कृतज्ञता, करुणा आणि प्राणिमात्रांवरील प्रेमाची परंपरा जपली.
विद्यार्थ्यांनी गोमातेला फुलांची माळ घालून, हळद-कुंकू लावून औक्षण केले. आरती करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. वसुबारसच्या माध्यमातून गोमातेचे शेती, ग्रामीण जीवन आणि भारतीय संस्कृतीतील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
सण-उत्सवातून विद्यार्थ्यांना केवळ परंपरेची ओळख न होता संस्कार, संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि प्राणिमात्रांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. ‘प्राणिमात्रांवर प्रेम करा, निसर्गाचे जतन करा आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या परंपरा जपा,’ असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे तसेच अंगणवाडी सेविका संजना गावकर व अमृता कविटकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला. शाळा आणि अंगणवाडी यांच्या या सामुदायिक सहभागातून विद्यार्थ्यांना सण-उत्सवातून संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात आली.
