पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांची ट्विटद्वारे माहिती
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यानची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही विमानसेवा सुरू होत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
दीपक कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता विमान उड्डाण करणार असून, सकाळी ९.०५ वाजता सिंधुदुर्ग येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९.२५ वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि सकाळी १०.३५ वाजता ते नवी मुंबई येथे दाखल होईल. या विमानसेवेचे नियमित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग ते नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातील सातही दिवस विमानप्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः मुंबई आणि नवी मुंबईशी नियमित संपर्क असणाऱ्या व्यावसायिक, पर्यटक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्यासही या विमानसेवेची मदत होणार आहे. चिपी विमानतळावरून नियमित विमानसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
