मलप्पे बंदरातील ट्रॉलरचा देवगडसमोर थरारक पाठलाग करून ताबा
तांडेलसह सात खलाशी ताब्यात, मंत्री नितेश राणे यांचे कारवाईवर लक्ष
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान (Sulthan)’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त करण्यात आली आहे. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २३.०० वाजता नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. मुणगे समोरील समुद्रात सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर सदर नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाची गस्ती नौका दिसताच संबंधित नौकेने पळ काढला. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठलाग करून देवगडसमोरील समुद्रात तिला पकडले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार नौका ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
जप्त नौकेची माहिती
नौकेचे नाव : सुलतान (Sulthan)
नोंदणी क्रमांक : IND-KA-02-MM-6335
मालक : श्रीमती गुलफाम अब्दुल मुनाफ
पत्ता : पुत्तूर, जि. उडुपी, कर्नाटक
परवाना : केवळ EEZ क्षेत्रासाठी वैध
मलप्पे बंदरातील नौकांकडून स्थानिक मच्छिमारांची जाळी वारंवार तोडली जात असल्याच्या तक्रारी मालवण व देवगड परिसरातील मच्छिमारांनी केल्या होत्या. यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मलप्पे बंदरातील नौकांवर लक्ष ठेवून होते.
गेल्या पाच दिवसांत दोन वेळा अशा नौका पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, संबंधित मासेमारी नौका गस्ती नौकेपेक्षा अधिक क्षमतेच्या असल्याने दोन्ही वेळा त्या निसटल्या होत्या. तरीही अधिकाऱ्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणारी ‘सुलतान’ नौका विभागाच्या ताब्यात आली.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे हे विभागाच्या कारवाईवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधात त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळाले असून, स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ही कारवाई मालवणचे अंमलबजावणी अधिकारी श्री. प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे यशस्वीपणे पार पाडली.
या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे मोठे आव्हान होते. दोन वेळा अपयश येऊनही अधिकारी खचले नाहीत. त्यांची चिकाटी, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. परप्रांतीय नौकेविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहण्यास मदत होत असून सागरी जैवविविधतेचेही संरक्षण होत आहे. नवीन गस्ती नौका उपलब्ध झाल्यानंतर अशा कारवाया अधिक वेगाने करता येतील आणि स्थानिक मच्छिमारांना निर्धास्तपणे मासेमारी करता येईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
बेकायदा मासेमारीविरोधात विभागाचे ‘शून्य-सहनशीलता’ धोरण यापुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
