You are currently viewing किशोरवयीन मुलींच्या HPV लसीकरणा बाबत पालक जनजागृती सभा उत्साहात संपन्न

किशोरवयीन मुलींच्या HPV लसीकरणा बाबत पालक जनजागृती सभा उत्साहात संपन्न

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अभयनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत (UPHC) दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली येथे किशोरवयीन मुलींमधील ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग आणि त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत पालक जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेस स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्योती रोकडे यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थित पालक व किशोरवयीन मुलींना HPV संसर्ग, त्याचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी असलेला संबंध तसेच या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व व परिणामकारकता याबाबत सविस्तर आणि शास्त्रीय माहिती दिली.

HPV लसीकरणाचे फायदे, योग्य वयात लसीकरण करण्याचे महत्त्व आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यामध्ये या लसीची भूमिका याबाबत डॉ. रोकडे यांनी सोप्या, स्पष्ट व सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालक व किशोरवयीन मुलींना HPV संसर्ग आणि लसीकरणाविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत झाली.

या सभेस महानगरपालिकेचे सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, अभयनगर आरोग्य केंद्राचे डॉ. रवींद्र चौगुले, आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे आणि HPV लसीकरणाविषयी पालकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा