यावर्षी तरी सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करा!
जनतेच्या मनोरंजनासह स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी द्या; समाजसेवक रवी जाधव यांची नगरपरिषदेकडे मागणी
सावंतवाडी :
शालेय शिक्षण मंत्री तथा माजी आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला सावंतवाडी पर्यटन महोत्सव कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेल्या सत्ताबदलामुळे बंद पडला. मात्र, यावर्षी तरी सावंतवाडी नगरपरिषदेने पर्यटन महोत्सवाचे आयोजन करून जनतेला मनोरंजनाची पर्वणी द्यावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे समाजसेवक रवी जाधव यांनी केली आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने सलग १४ सावंतवाडी पर्यटन महोत्सव यशस्वीपणे पार पडले होते. त्यानंतर महोत्सवाची परंपरा खंडित झाली. २०२३ मध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, दीपक केसरकर मित्रमंडळ, रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांचा मिनी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०२४ मध्येही मिनी महोत्सव झाला; मात्र त्यानंतर महोत्सवाचे आयोजन झालेले नाही.
