पर्जन्यमापक यंत्रांअभावी आंबा-काजू उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित!
सिंधुदुर्गातील यंत्रे नसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून तातडीने पर्जन्यमापक बसवा; जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी
सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे उपलब्ध नसल्यामुळे काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात पिकांचे नुकसान होऊनही केवळ पावसाची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमापक यंत्रे नसलेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन यंत्रे बसवावीत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काजू आणि आंबा या फळपिकांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने पावसाची अधिकृत नोंद उपलब्ध होत नाही. परिणामी, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाईचा लाभ मिळवताना अडचणी येत आहेत.
शेतकरी वर्षभर कष्ट करून बागांची देखभाल करतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर केवळ पर्जन्यमापक यंत्रांच्या अभावामुळे त्यांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे राऊळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यासाठी पर्जन्यमापक यंत्रे नसलेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करावे, आवश्यक गावांमध्ये नवीन यंत्रे बसवावीत, काजू व आंबा पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, तसेच यंत्रांच्या अभावामुळे पीक विमा व नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची विशेष तपासणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
उपलब्ध हवामानविषयक नोंदी आणि प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी केली आहे.
