नगराध्यक्ष संदेश पारकर यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी
मंत्र्यांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
कणकवली :
कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्र्यांनी कणकवली बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता नगराध्यक्ष पारकर यांनी ही मागणी मांडली. यावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कणकवली बसस्थानकाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे उत्साहात स्वागत केले. या भेटीदरम्यानच बसस्थानक परिसराच्या विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण निवेदन त्यांनी मंत्र्यांकडे सुपूर्द केले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बसस्थानक परिसरातील उपलब्ध अतिरिक्त जागेचा नियोजनबद्ध विकास करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. याशिवाय बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देणे शक्य होणार आहे.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेची सविस्तर माहिती घेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. नगरपंचायतीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
